पश्चिम बंगालमधील ३०० डॉक्टरांचे राजीनामे


नवी दिल्ली – येत्या १७ जूनला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेने देशव्यापी संप पुकारण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांनी बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सुरू केलेला हा लढा उग्र रूप घेत असून आतापर्यंत बंगालमधील ३०० डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत.

एका डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी ५ दिवसांपासून संप सुरू केला आहे. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना योग्य प्रतिसाद न दिल्याने या संपाचे लोण देशभर पसरले. दिल्ली, मुंबई, नागपूर, हैदराबाद, केरळ, राजस्थान या ठिकाणीही काल (१४ जून) संप पुकारण्यात आला होता.

ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये सुरू झालेला हा डॉक्टरांचा संप मागे घेण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनामागे माकप आणि भाजप यांचा हात असून एसएसकेएम रुग्णालयात बाहेरचे लोक घुसून त्यांनी हा असंतोष निर्माण केला आहे, असा आरोप त्यांनी केला होता. ममतांच्या या वक्तव्याची त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही डॉक्टरांच्या संघटनेकडून केली जात आहे.

ममतांपुढे डॉक्टरांच्या संघटनेने ६ अटी ठेवल्या असून संप त्या पूर्ण झाल्याशिवाय मागे घेणार नसल्याचा इशारही देण्यात आला आहे. कोलकात्याच्या एसएसकेएम रुग्णालयातील १७५ डॉक्टरांनी आतापर्यंत राजीनामा दिला असून राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांचा आकडा ३०० पर्यंत पोहोचला आहे. राज्य सचिवालयात डॉक्टरांना ममतांनी चर्चेसाठी बोलवले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यावर बहिष्कार टाकत ममता आमची एकता तोडण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

आमच्या मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी संप येत्या १७ जूनला पुकारण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व रुग्णसेवा १७ जूनला बंद असतील. आयएमएतर्फे या संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या या संपाचा फटका रुग्णांना बसत असून ओडिशात प्रसुतीदरम्यान एका महिलेचा तिच्या जुळ्या मुलांसह मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

Leave a Comment