वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना पुणे पोलिसांकडून गिफ्ट व्हाऊचर


पुणे – आपल्यापैकी अनेकांना चौकाचौकात वाहतुकीचे नियमन करणारा ट्रॅफिक पोलीस दिसला की घाम फुटतो. आपल्याला त्यांनी पकडल्यास आपल्या खिशाला कात्री बसणार असा आपल्यापैकी अनेकांचा समज असतो. मागील काही दिवसांपासून पुण्यातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक पोलिसांची जोरदार कारवाई सुरू आहे.

नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होत आहे. दुचाकीस्वार दिसला की घ्या बाजुला अन् फाडा पावती, असे प्रकार सध्या सुरू आहेत. पण याच प्रमूख रस्त्यावर काल काही वेगळे चित्र दिसत होते. दंडाची पावती फाडणारे हेच वाहतूक पोलीस वाहनचालकांना गिफ्ट व्हाऊचर वाटत होते. वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे आतापर्यंत पैसे वसूल करणारे पोलीस आता वाहतूकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना गिफ्ट व्हाऊचर वाटताना दिसून आले.

पुणे पोलिसांनी वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांसाठी आधार योजना सुरू केली आहे. पुणे वाहतुक पोलिसांनी वाहतूक शिस्तीचे नियम पाळा, आणि झकास गिफ्ट कुपन मिळवा, अशी योजना सुरु केली आहे. वाहतूकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना या योजनेअंतर्गत गिफ्ट व्हाऊचरचे वाटप करण्यात येणार आहे. एखाद्या वाहनचालकावर कारवाईदरम्यान वाहतुकीचे नियम मोडल्याचा दंड नसल्याचे लक्ष्यात आल्यानंतर पोलिसांच्या वतीने अशा वाहनचालकाला गिफ्ट व्हाऊचर देण्यात येणार आहे. शहरातील रेस्टारंट, हॉटेल्स, गारमेंट शॉप, सराफा दुकान, मॉल्स या ठिकाणी खरेदी केल्यानंतर वाहनचालकाना हे व्हाऊचर दाखवताच 10 ते 15 टक्के सुट मिळणार आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख या उपक्रमविषयी माहिती देताना म्हणाले, केवळ दंडात्मक कारवाई शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी करून चालणार नसल्याचे आमच्या लक्षात आल्यामुळे जर नियम पाळणाऱ्या नागरिकांची चांगल्याप्रकारे दखल घेतली तर सकारात्मक भावना लोकांमध्ये निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे हा उपक्रम राबविण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले.

Leave a Comment