वर्षातून एकदाच नागपंचमीला उघडते हे नागमंदिर


शतकानुशतके हिंदू धर्मीय नागाला देवता मानत आले आहेत आणि देशात विविध ठिकाणी विविध मंदिरात नागाच्या मूर्ती पाहायला मिळतात. नागपंचमी म्हणजे श्रावणातली पंचमी नागपूजेसाठी विशेष प्रसिद्ध आहे. नाग हे हिंदू देवतेचा दागिना म्हणूनही पूजले जातात. मध्यप्रदेशातील उज्जैन या प्राचीन नगरीत ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर असलेले नागचंद्रेश्वर मंदिर देशात विशेष महत्वाचे असून ते वर्षातून एक दिवस नागपंचमी दिवशी २४ तासासाठी उघडले जाते. नागपंचमीच्या आदल्या रात्री १२ वा. हे मंदिर उघडले जाते. त्यानंतर तेथे त्रिकाल पूजा केली जाते. आरती नंतर भाविकांना दर्शनासाठी ते खुले केले जाते. येथे या दिवशी सरकारी पूजा केली जाते.


या मंदिरात असलेली मूर्ती ११ व्या शतकातील असल्याचे मानले जाते. ही मूर्ती नेपाळमधून आणली गेली असे सांगतात. विशेष म्हणजे अशी मूर्ती देशात अन्यत्र कुठेही नाही. नागाच्या आसनावर शिव पार्वती विराजमान असलेली ही प्रतिमा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे एकमेव असे मंदिर आहे ज्यात विष्णू ऐवजी भोलेश्वर पार्वतीसह सर्प शय्येवर विराजमान आहेत. दशमुखी सर्पशय्येवर शिव पार्वती गणेशासह आहेत. शिवमूर्तीच्या गळ्यात, बाहूवर सुद्धा नाग आहेत.

या मंदिराबाबत अशी मान्यता आहे कि, तक्षक नाग या दिवशी येथे वास्तव्यास असतो. तक्षकाने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी येथे घोर तप केले होते. त्याला शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी तक्षकाला अमरत्वाचा वर दिला. तक्षकाने शिवाच्या सानिध्यात वास्तव्य करण्यासाठी हे स्थान निवडले.


नागपंचमीला या मंदिरात येऊन जे भाविक दर्शन घेतात त्यांचा सर्पदोष नाहीसा होतो आणि त्यांच्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांची इच्छापूर्ती होते असा विश्वास आहे. हे मंदिर राजा परमार भोज याने इसवी सन १०५० मध्ये बांधल्याचे सांगितले जाते. नंतर सिंदिया राजघराण्यातील राणोजी राजे यांनी त्याचा १७३२ मध्ये जीर्णोद्धार केला. नागपंचमीच्या दिवशी येथे सरासरी दोन लाख भाविक दर्शनाला येतात.

Leave a Comment