लॉजिस्टिकमध्ये वाढणार सव्वाकोटी रोजगार

logistic
नवी दिल्ली: सातत्याने वाढणाऱ्या लॉजिस्टिक क्षेत्रात सन २०२२ पर्यंत तब्बल १ कोटी १७ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील; असे नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्या या क्षेत्रात १ कोटी ६७ लाख रोजगार उपलब्ध असून ही संख्या २ कोटी ८४ लाख एवढी वाढू शकते; असा दावा अहवालात केला आहे.

लॉजिस्टिक्स, वाहतूक, मालाची देखभाल आणि गोदाम व्यवस्थापन, पॅकेजिंग या क्षेत्रात व्यवसाय वृद्धीच्या मोठया संधी असून या क्षेत्राची वाढ सध्या ५२ टक्क्यांनी होत आहे. ई कॉमर्समध्ये होणारी वाढ, नागरिकांचे वाढते उत्पन्न आणि क्रयशक्ती आणि गोदाम व्यवस्थापन क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणुकीला मान्यता यामुळे लॉजिस्टिक क्षेत्र वेगाने वाढत आहे.

मात्र इतर क्षेत्रांच्या तुलनेने कामाच्या ठिकाणी असलेला सुविधांचा अभाव आणि अपुरे वेतन यामुळे तज्ज्ञ मनुष्यबळाला आकृष्ट करून घेणे; हे या क्षेत्रासमोर असलेले मुख्य आव्हान आहे; या क्षेत्रात येऊ घातलेल्या विदेशी स्पर्धकांमुळे लॉजिस्टिक आणि वाहतूक क्षेत्राला अधिक नियोजित, सुसूत्र आणि संघटीत स्वरूप देणे आवश्यक आहे. त्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण घेतलेल्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे;

मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, सुरत आणि इंदौर या शहरांमध्ये लॉजिस्टिक क्षेत्राला मोठा वाव असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment