बशीरचाचांच्या तिकीटाची धोनीने केली व्यवस्था


इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यात १६ जून ला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येत असून त्या सामन्याची तिकिटे बुकिंग सुरु होताच काही मिनिटात संपली होती. मात्र ६ हजार मैलावरून हा सामना बघण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी बशीर चाचा उर्फ शिकागो चाचा यांना तिकीटाची काळजी नव्हती कारण भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने त्यांच्या तिकीटाची व्यवस्था केली आहे. धोनी २०११ पासून शिकागो चाचा यांना सामन्याचे तिकीट देत असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

बशीर चाचा धोनीचे चाहते आहेत आणि भारत पाकिस्तान मध्ये होणाऱ्या बहुतेक सर्व सामन्यांना ते हजर असतात. ते धोनी आणि भारत याना चीअर करण्यासाठी आवर्जून येतात. भारत पाक मधील बहुतेक सर्व बडे सामने त्यांनी पहिले आहेत. बशीर चाचांचे शिकागो मध्ये रेस्टॉरंट असून त्यांच्यकडे अमेरिकन पासपोर्ट आहे. २०११ च्या विश्वकपच्या वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्याला ते हजर होते आणि तेथेच त्यांचे आणि धोनीचे बाँडिंग जमले ते आजही कायम आहे.


चाचा सांगतात ते गुरुवारी मँचेस्टर ला आले तेव्हा त्यांच्याकडे सामन्याचे तिकीट नव्हते पण धोनी तिकीट देणार याची खात्री होती. या सामन्याची २० हजार तिकिटे विक्री सुरु होताच काही मिनिटात संपली होती आणि आता ही तिकिटे रिसेल मध्ये ६० हजार रुपयांना विकली जात आहेत. चाचा सांगतात त्यांनी धोनीशी एसएमवरून संपर्क केला आणि ते आल्याचे कळविले. धोनीने तिकीटाची व्यवस्था झाली असल्याचे सांगितले. चाचा म्हणतात धोनी माणूस म्हणून खूपच चांगला आहे. त्याच्यासाठी यंदा त्यांनी खास गिफ्ट आणले आहे आणि ते लवकरच त्याला देणार आहेत.

चाचा आणि सचिनचा चाहता सेलेब्रिटी सुधीर कुमार एकाच हॉटेल मध्ये एकाच रूम मध्ये उतरले आहेत. चाचा यांच्या भारत प्रेमामागे त्यांची पत्नी हैद्राबादची आहे हेही एक कारण आहे. भारत पाक सामन्याच्या वेळी चाचा दोन्ही देशांच्या रंगाची जर्सी घालणार असून ते दोन्ही देशासाठी शांतीदूत आहेत असे सांगतात.

Leave a Comment