जमीन हडप केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा धनंजय मुंडेंना दिलासा


नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती दिली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र शासन आणि तक्रारदार यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.

धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून बीड जिल्ह्यातील बेलखंडी मठाला बक्षीस दिलेली सरकारी जमीन त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. पाहायला गेले तर बक्षीस मिळालेल्या कुठल्याही जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. पण यावेळी दबाव आणून खरेदी व्यवहार करण्यात आला, असा आरोप राजाभाऊ फड यांनी केला होता. फड यांनी त्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली होती. औरंगाबाद खंडपीठाने त्यानुसार सुनावणी करत मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

धनंजय मुंडेंनी औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी काल सुनावणी करण्यास मान्यता दिली होती. आज त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी धनंजय मुंडेंना दिलासा देत औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशांना स्थिगिती दिली आहे. तसेच महाराष्ट्र शासन आणि तक्रारदार राजाभाऊ फड यांनाही न्यायालयाने नोटीस जारी केली आहे.

Leave a Comment