ट्रिपल तलाक विधेयकास समर्थन देण्यास नितीश कुमारांचा नकार


नवी दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री तथा जनता दल (यु) चे अध्यक्ष नितीश कुमार यांनी राज्यसभेत ट्रिपल तलाक मुद्द्यावर सरकारचे समर्थन करणार नसल्याची भूमिका घेतली असल्याची माहिती बिहारचे मंत्री श्याम रजक यांनी दिली. भाजपप्रणीत एनडीए आघाडीचा नितीश कुमारांचा जनता दल हा पक्ष सदस्य आहेत. भाजपसाठी जद (यु)चा हा निर्णय धक्कादायक मानला जात आहे.

काल ट्रिपल तलाक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. येत्या अधिवेशनात हे विधेयक संसदेच्या राज्यसभेत मांडले जाईल. या विधेयकाला लोकसभेत मंजूरी मिळाली असली तरी हे विधेयक राज्यसभेत प्रलंबितच आहे. या विधेयकाचे यावेळी राज्यसभा समर्थन करेल आणि ते पास होईल असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

ट्रिपल तलाक विधेयक राज्यसभेत प्रलंबित आहे. पण, आता या विधेयकाला समर्थन न देण्याची भूमिका नितीश कुमारांनी घेतल्याने ते पारित होण्यास अडचणी येऊ शकतात. राज्यसभेत भाजपला बहुमत नाही. राज्यसभेत हे विधेयक पारित न झाल्यास सरकार पुन्हा एकदा तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. या विधेयकाच्या विरोधात आम्ही असून त्याविरुद्ध लढा देत राहू अशी प्रतिक्रिया बिहारचे मंत्री श्याम रजक यांनी दिली आहे.

नितीश कुमार यांची नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपासून एनडीएतील भूमिका संदिग्ध राहेलेली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातही सहभागी होण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्याचबरोबर आगामी काळात होणाऱ्या राज्यांतील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केल्याने नितीश कुमार आणि भाजप यांच्यात तेढ निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. पण नितीश यांचे बिहारमधील सरकार भाजपच्या पाठिंब्यावर अवलंबून असून केंद्र सरकारडून आता नितीश यांच्या भूमिकेवर काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Comment