विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती


मुंबई – विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज वडेट्टीवार यांची नियुक्ती केल्याचे पत्र लोकसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी जारी केले आहे. काँग्रेसने वडेट्टीवार यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आक्रमक नेता म्हणून ओळख असलेल्या नेत्याला विरोधीपक्ष नेतेपद दिल्याने विधानसभेत काँग्रेसच्या सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

दूसरीकडे विधिमंडळ नेतेपदी विरोधी पक्षनेते पदाच्या शर्यतीत असलेले बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. तर नसीम खान उपनेता म्हणून आणि काँग्रेसने मागील अनेक वर्षांपासून चर्चेपासून दूर राहिलेल्या बसवराज पाटील यांना काँग्रेसने मुख्य प्रतोद म्हणून संधी दिली आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणूक कालावधीत के.सी पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात प्रचार करणाऱ्या जयकुमार गोरे यांनाही या वेळी काँग्रेसने प्रतोदपदी नियुक्ती करून एक सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्मुला वापरला आहे.

काँग्रेसने विधानसभेसोबतच विधानपरिषदेच्या ही नेत्यांची नव्यानी फेरनियुक्ती केली आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांची विधानपरिषदेचे नेते म्हणून नियुक्ती केली आहे. तर उपनेते म्हणून रामहरी रुपनवर यांची नियुक्ती आली असून त्यासोबतच भाई जगताप यांना प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी दलित चेहरा दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर त्यासोबतच मराठा कार्ड म्हणून पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची नावेही चर्चेत होती. पण मुंबईत मागील महिन्यात याविषयी झालेल्या बैठकीत या चारही नावावर चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राज्य काँग्रेस कमिटीने केंद्रीय कमिटीवर सोपवले होते. त्यासाठीचा प्रस्ताव मंजूर केला होता.

आज काँग्रेसने त्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. त्यामुळे सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात वडेट्टीवार यांच्या आक्रमक भाषणामुळे काँग्रेसमध्ये एक चैतन्य निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment