शांत झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी घ्या योग संगीताचा आनंद

music
अनेकदा दिवसभर जास्त श्रम केल्याने किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक तणाव असल्यास रात्री शांत झोप लागणे शक्य होत नाही. शरीराला आणि मनाला विश्रांती मिळण्यासाठी शांत, कोणत्याही प्रकारच्या व्यत्ययाशिवाय घेतलेली झोप अतिशय महत्वाची असते. त्यामुळे शांत झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी काही काळ संगीताचा आनंद घेतल्याने निश्चित लाभ होईल असे वैज्ञानिकांनी केलेल्या शोधामध्ये निष्पन्न झाले आहे.
music1
राजस्थान येथील जयपूरच्या एका प्रसिद्ध वैज्ञानिक संस्थेमध्ये या संदर्भात केल्या गेलेल्या रिसर्चमध्ये हे निदान वैज्ञानिकांनी केले आहे. त्या वैज्ञानिक संस्थेशी संलग्न असलेल्या इस्पितळामधील रुग्णांवर हा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला आहे. या प्रयोगाला वैज्ञानिकांनी ‘म्युझिक थेरपी’ असे नाव दिले आहे. या बाबतीत केल्या गेलेल्या संशोधनामध्ये योग संगीत ऐकल्याने त्याचा सकारात्मक परिणाम हृदयाच्या गतीवर होत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
music2
या संशोधनाअंतर्गत एका विशिष्ट वयोगटाच्या सुमारे दीडशे व्यक्तींवर हा म्युझिक थेरपीचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग तीन निरनिराळ्या सेशन्समध्ये करण्यात आला. पहिल्या सेशनच्या वेळी सर्वांना योगसंगीत ऐकविण्यात आले. दुसऱ्या सेशनमध्ये सर्वांनी पॉप संगीत ऐकले, तर तिसऱ्या सेशनमध्ये विना संगीत ऐकताच सर्वांना झोपण्यास सांगण्यात आले. या तीनही सेशन्सच्या दरम्यान सर्वांच्या हृदयाच्या ठोक्याच्या गतीवरही लक्ष ठेवण्यात आले होते. संगीत सुरु असताना आणि संगीत संपल्यानंतर, अश्या दोन्ही वेळी हृदयाच्या गतीचे अवलोकन केले गेले.
music3
या प्रयोगावरून वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला, की योग संगीताचे श्रवण केल्याने या प्रयोगामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींचा मानसिक तणाव कमी झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम त्याच्या हृदयाच्या गतीवर दिसून आला. या प्रयोगाच्या संबंधी सर्व तपशील आणि निष्कर्ष जर्मनीमध्ये होत असलेल्या ‘युरोपियन सोसायटी ऑफ कार्डियोलॉजी काँग्रेस’ मध्ये प्रस्तुत करण्यात आले आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment