मुंबई – केंद्रातील भ्रष्ट्र अधिकाऱ्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदल्या केल्यानंतर आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रालयातील बाबू लोकांना दणका दिला आहे. सात ते आठ वर्षे सातत्याने एकाच विभागात कार्यरत असलेल्या तब्बल 70 अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बदल्या केल्या आहेत.
फडणवीसांनी केल्या मलाईदार विभागातील 70 अधिकाऱ्यांच्या बदल्या
शासनाने नियमानुसार बदल्या केलेल्या असतानाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले वजन वापरून पुन्हा मलाईदार विभागात येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने घाबरगुंडी उडाली असून पुढे आता कोणाचा नंबर अशी चर्चा जोर धरू लागली आहे. बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये १४ उपसचिव, ४४ कक्ष अधिकारी आणि 11 अप्पर सचिवांचा समावेश आहे.
अधिकारी आणि कर्मचारी यांचा मंत्रालयात स्वतंत्र संवर्ग आहे. महत्त्वाचे निर्णय आणि धोरणे राज्याच्या या मुख्यालयात निश्चित होतात. डेस्क अधिकाऱ्यांची यात महत्वाची भूमिका असते. पण विशिष्ट विभागात काही अधिकाऱ्यांची एकप्रकारची मक्तेदारी निर्माण झालेली असते. मुख्यमंत्र्यानी या मक्तेदारीला बदल्या करून चांगलाच चाप लावला आहे. सात-आठ वर्षे एकाच विभागात असलेल्या अधिकाऱ्यांना याचा जोरदार फटका बसला आहे. महसूल, नगरविकास, ग्रामविकास, गृहनिर्माण ,सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा या मलईदार विभागातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्याच्या प्रशासकीय कायद्यात 2005 मध्ये सुधारणा करण्यात आली त्यानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या विभागात अथवा वेगळ्या ठिकाणी बदली करण्याचा नियम आहे. हा कायदा मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही लागू आहे. पण, फक्त मंत्रालयातच त्यांच्या बदल्या एका विभागातून दुसऱ्या विभागात करण्याची तरतूद आहे. दुसऱ्या कमी महत्वाच्या विभागात बदली करण्यात आल्यास आपले हिंतसंबंध कामी लावत डेस्क अधिकारी पुन्हा मुळच्या जागेवर येत असल्याचे निदर्शनाला आल्याने मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.