या मंदिरात आहे शंकराचे त्रिशूळ


देवांचे देव महादेव यांचे अस्त्र म्हणजे त्रिशूळ. उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात असलेले गोपेश्वर मंदिर शंकराला समर्पित आहे. या स्थानाचे विशेष म्हणजे येथे शंकराचे त्रिशूळ पाहायला मिळते. गोपेश्वर गावात असलेले हे प्राचीन मंदिर अद्भुत घुमट आणि २४ दरवाजे असलेले आहे. हिंदू भाविकांसाठी हे अतिपवित्र स्थळ आहे. या महादेवाच्या दर्शनाने भक्तांची सारी दु;खे संपतात असे मानले जाते. केदारनाथ नंतरचे प्राचीन शिवमंदिर मानले जाते. या मंदिर परिसराच्या चारी बाजूला भग्न मूर्तींचे अनेक अवशेष दिसतात त्यावरून येथे प्राचीन काळी मंदिर समूह असावा असा तर्क केला जातो.


या मंदिराच्या अंगणात एक त्रिशूळ असून तो अष्टधातू पासून बनविलेला आहे. त्याची उंची सुमारे १५ फुट असून तो १२ व्या शतकातला असावा असा अंदाज केला जातो. आता हा त्रिशूळ येथे कसा आला याची एक कथा सांगितली जाते. पुराणात वर्णन केल्याप्रमाणे पूर्वी ही जमीन म्हणजे शिवाची तपस्या भूमी होती. शिवाने येथे अनेक वर्षे तपस्या केली. देवी सतीच्या शरीराच्या त्याग केल्यावर शंकर तपस्येत लीन झाले होते. त्यावेळी ताडकासूर नावाच्या एका राक्षसाने त्रिलोकात हाहा;कार माजविला होता. त्याला कुणीच हरवू शकत नव्हते त्यामुळे देवांनी शंकराची आराधना सुरु केली.


शंकर त्यावेळी तपस्येत होते त्यातून त्यांना बाहेर कसे काढायचे हा प्रश्न होता. तेव्हा इंद्राने त्यासाठी कामदेवाची नियुक्ती केली. शंकराची तपस्या भग्न करून त्याचा पार्वतीशी विवाह करायचा आणि त्यांना होणारा मुलगा ताडकासुराचा वध करेल अशी ही योजना होती. त्यानुसार कामदेवाने शंकराला कामबाण मारला आणि त्याची तपस्या मोडली. तपस्या भंगाने चिडलेल्या शंकरांनी कामदेवावर त्रिशूळ फेकला तो तेथेच रुतून बसला. नंतर येथेच मंदिराची उभारणी केली गेली.


या त्रिशुळावर हवेचा कोणताही परिणाम होत नाही. एखाद्याने हा त्रिशूल शक्तीच्या जोरावर हलवायचे ठरविले तर तो मुळीच हलत नाही मात्र एखाद्या भाविकाने श्रद्धेने या त्रिशुळाला नुसत्या बोटाने स्पर्श केला तरी तेथे कंपने जाणवतात. या मंदिरात शिवाची नाही तर परशुराम आणि भैरव यांची मूर्ती असून गर्भगृहात शिवलिंग आहे. जवळच वैतरणी कुंड आहे. या कुंडात स्नान करण्याचे खास महत्व आहे.

Leave a Comment