भूक कधीही, कुणालाही आणि कधीही लागू शकते. कडकडून भूक लागली असताना कांही तरी खमंग चमचमीत मिळण्याची शक्यता दिसली तर भुकेला माणूस कोणत्या थराला जाऊ शकेल हे सांगता येणे अवघड.त्यातून आकाशातून उडताना भूक लागली तर काय करायचे? मात्र याचे अनोखे उदाहरण ऑस्ट्रेलियातील सिडने शहरात दिसून आले.
भुकेने कळवळला आणि मॅक डी समोर उतरविले हेलिकॉप्टर
एका हेलिकॉप्टर पायलटला उड्डाण करत असतानाच खूप भूक लागली. सिडनेतील एका भागात असलेल्या मॅकडोनल्डच्या आऊटलेटवर त्याची नजर जाताच त्याला भूक शमविण्याचा मार्ग सापडला आणि त्याने चक्क हेलिकॉप्टर या आउटलेट समोर उतरविले. दुकानातून खाद्य पदार्थ घेतले आणि पुन्हा हेलिकॉप्टरमधून तो निघून गेला.
झाले इतकेच की अचानकच हेलिकॉप्टर हेलीपॅड नसतानाही खाली येताना पाहून तेथील नागरिकांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. पण सावरलेल्या नागरिकांनी लगेच त्याचे व्हीडीओ चित्रण केले तसेच पायलटनेही स्वतःच तेथे फोटो काढले. ऑस्ट्रेलियाच्या नाईन न्यूजवर हा प्रकार दाखविला गेला तेव्हा सिव्हिल एव्हीएशन अॅथॉरिटीने पायलटकडे त्यासाठीची परवानगी असेल तर त्याची कांही चूक नसल्याचे स्पष्टी करण दिले आहे मात्र तरीही या प्रकाराची चौकशी होईल असेही स्पष्ट केले आहे.