चांद्रयान दोनची कमान सांभाळणार या दोन महिला


इस्त्रोने १५ जुलै रोजी पहाटे २.५१ मिनिटांनी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा तेथून चांद्रयान दोन लाँच केले जात असल्याचे जाहीर केले असून यंदा चांद्रयान दोनची संपूर्ण जबाबदारी दोन महिला वैज्ञानिक सांभाळणार आहेत. यंदाचे हे पहिले आंतरग्रहीय मिशन यामुळे खास मानले जात आहे. यापूर्वी ऑक्टोबर २००८ मध्ये पहिले चांद्रयान रवाना केले गेले होते.


चांद्रयान दोन मोहिमेची जबाबदारी रितू करिधल आणि एम वनिता या दोन महिला वैज्ञानिकांच्या खांद्यावर आहे. रितू या मोहिमेत मिशन डायरेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत तर वनिता प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के.सिवन यांनी या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले कि, इस्रो महिला व पुरुष असा भेट कधीच मानत नाही. इस्रोमध्ये ३० टक्के महिला काम करतात आणि महिलांनी जबाबदारी घेऊन एखादे मिशन पार पाडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी मंगळ मिशन मध्ये ८ महिला वैज्ञानिकांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

मिशन डायरेक्टर रितू करिधल यांना रॉकेट वूमन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी मार्स ऑर्बीटर मिशनमध्ये डेप्युटी मिशन डायरेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकी शाखेतून पदवी घेतली असून २००७ साली त्यांना माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते इस्रो यंग सायंटीस्ट अॅवॉर्ड मिळाले आहे. लहानपणापासून त्यांना अंतराळ विज्ञानात रुची आहे आणि गेल्या २१ वर्षात इस्रो मध्ये त्यांनी अनेक प्रोजेक्टवर काम केले आहे.


एम वनिता या डिझाईन इंजिनीअर असून अॅस्ट्रॉनॉमीकल सोसायटी ऑफ इंडियाच्या २००६ च्या बेस्ट वूमन सायंटीस्ट अॅवॉर्ड विजेत्या आहेत. सॅटेलाइट विषयातील त्यांचा मोठा अनुभव असून अनेक वर्षे त्या या क्षेत्रात काम करत आहेत. या प्रोजेक्टचे सर्व काम त्यांच्या देखरेखीखाली होणार आहे. चांद्रयान दोन हा खास उपग्रह आहे कारण त्यात ऑर्बिटर, विक्रम नावाचे लँडर आणि प्रज्ञान नावाचे रोवर आहे. भारत या मोहेमेतून प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे आणि हे काम सर्वात अवघड आहे. या मोहिमेसाठी ६०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Leave a Comment