एकाच झाडावर ४० प्रकारची फळे उगविणारा अवलिया


ट्री ऑफ फोर्टी नावाचे एक झाड सध्या खूपच चर्चेत असून या एकाच झाडावर विविध ४० प्रकारची फळे लगडली आहेत. ही किमया केली आहे अमेरिकेतील व्हिज्युअल आर्ट्स प्रोफेसर वॉन यांनी. त्यांनी एकाच झाडावर विविध कलमे करून त्यापासून या झाडावर बोरे, चेरी, पीच सारखी ४० प्रकारची फळे उगवून दाखविली आहेत. या प्रकारे त्यांनी आत्तापर्यंत २१ झाडे तयार केली असून ती अमेरिकेत विविध ठिकाणी विकली आहेत. या एका झाडाची किंमत १९ लाख रुपये आहे.

झाडावर कलम करून अधिक चांगल्या प्रकारची आणि किडीला यशस्वी तोंड देऊ शकणारी फळे आणि फुले बनविण्याचे शास्त्र तसे खूपच रुळले आहे. त्यामुळे एकच झाडावर लाल, पिवळा आणि पांढरा गुलाब अथवा अन्य फुले फुलताना दिसतात. तसेच एकाच झाडावर पेरू पीच सारखी दोन तीन प्रकारची फळे येतात. मात्र एका झाडावर ४० प्रकारची फळे हे अजूनही नवल या सदरात मोडते.


ही किमया घडविणारे प्रो. वॉन मूळचे शेतकरी कुटुंबातील आहेत त्यामुळे त्यांना लहानपणापासून शेती मध्ये रुची आहे. त्यांना शेतीची आवड आहे. या प्रकारे विविध दुर्मिळ जातीची फुले आणि फळे असलेला एक बगिच्या देखभाल परवडत नसल्याने विक्रीसाठी आला होता. वॉन यांनी तो लीझवर घेतला आणि तेथे कलमाचे विविध प्रयोग त्यांनी सुरु केले. त्यातून हे अद्भुत झाड जन्माला आले आहे. २००८ सालापासून प्रो. वॉन विविध फळे एकाच झाडावर घेण्याचे प्रयोग करत असून त्यांच्या मते हे आर्टवर्क आहे.


प्रो. वॉन सांगतात ज्या झाडावर कलम करायचे ते किमान ३ वर्षाचे हवे. त्यानंतर त्यावर दुसऱ्या झाडाची कळीसह असलेली निरोगी फांदी निवडून त्याचे कलम करायचे. त्याची पूर्ण रुजवणूक झाली कि दुसरे कलम करायचे. अश्यापकारे विविध फळे देणारे झाड विकसित करण्यासाठी किमान ९ वर्षे लागतात. त्यांनी अशी २१ झाडे अमेरिकेत विकली असून त्यातील ७ न्यूयॉर्क, ६ पोर्टलंड व बाकी इलीनॉइस, मिशिगन, कॅलिफोर्निया या ठिकाणी दिली आहेत.

प्रोफेसर ज्या लोकांनी ही झाडे खरेदी केली त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन झाडांची निगराणी करतात. या झाडांची देखभाल आणि व्यवस्थापन हे मोठे काम असून पहिली तीन वर्षे प्रोफेसर स्वतः त्या जागी जाऊन पाहणी करतात. हे काम दर सहा महिन्यांनी केले जाते आणि उन्हाळ्यात झाडावर नवी कलमे केली जातात. या प्रकारे कलमे करण्याची प्रक्रिया पाच वर्षे चालते.

Leave a Comment