अशी आहे उबेरची उडणारी टॅक्सी


येणार येणार अशी गेली अनेक दिवस चर्चेत असलेली उबेरची उडणारी टॅक्सी अखेर सादर करण्यात आली असून ही टॅक्सी आतून कशी आहे याची झलक दाखविली गेली आहे. उबेर एअर टॅक्सी सेवा २०२३ पासून सुरु करणार असून त्याच्या चाचण्या पुढील वर्षापासून सुरु केल्या जात आहेत. उबेरने सर्वप्रथम या टॅक्सीचे प्रोटोटाईप डिझाईन शेअर केले होते मात्र आता प्रत्यक्ष टॅक्सी सादर केली आहे.


वॉशिंग्टन डीसी मध्ये झालेल्या वार्षिक उबेर एलीव्हेट फ्लाईंग टॅक्सी परिषदेत ही उडणारी टॅक्सी सादर केली गेली. ही टॅक्सी आतून बरीचशी हेलिकॉप्टर प्रमाणे आहे. या टॅक्सीची अंतर्गत सजावट फ्रांसची एअरोस्पेस कंपनी साफ्रानने केली आहे. या टॅक्सीमधून एकावेळी चार प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. हा प्रवास खूपच कमी वेळात होणार आहे. एक राईड २० मिनिटांची असेल. त्यात पिकअप ड्रॉप टाईमही समाविष्ट आहे. या प्रवासासाठी किती भाडे आकारले जाणार हे अजून स्पष्ट केले गेलेले नाही. मात्र याच अंतराच्या हेलिकॉप्टर राईडपेक्षा ते कमी असेल असे समजते.


या टॅक्सीमध्ये चार प्रवासी आणि पुरेसे सामान ठेवण्याची जागा आहे. ही टॅक्सी उडत असताना खास लाईट सुरु असेल आणि तो निळ्या रंगाचा असेल. तर प्रवासी उतरत असताना पांढरया रंगाचा लाईट लागेल. ही सेवा सर्वप्रथम टेक्सासच्या डलास आणि लॉस एंजेलिस येथे सुरु होणार आहे.

भारतात सुद्धा ही फ्लाईंग टॅक्सी सेवा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी कंपनीने फ्लाईंग टॅक्सी सेवेसाठी रेग्युलेटरी फ्रेमवर्क बनवावे यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकार आणि हवाई उड्डाण मंत्रालयासोबत चर्चा सुरु असल्याचे समजते.

Leave a Comment