आता ड्रोनच्या माध्यमातून होम डिलिव्हरी करणार झोमॅटो


नवी दिल्ली – आजवर आपण ऑनलाईनच्या माध्यमातून कोणताही खाद्यपदार्थ मागविल्यानंतर आपल्या दारात एक डिलिव्हरी बॉय उभा रहातो. पण आता यापूढे त्या डिलिव्हरी बॉयची जाग ड्रोन घेणार आहे. ही अविश्वसनीय वाटणारी सेवा लवकरच सत्यात अवतारण्याची शक्यता आहे. कारण ड्रोनद्वारे घरपोच अन्न पोहोचविण्याची यशस्वी चाचणी ऑनलाईन फूड कंपनी झोमॅटोने घेतली आहे. हायब्रीड ड्रोनचा वापर त्यासाठी करण्यात आला आहे. ५ किमीचे अंतर ड्रोनने केवळ १० मिनिटात पूर्ण केले. ड्रोनचा वेग यावेळी ताशी ८० किमी प्रति तास एवढा होता.

झोमॅटोने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने मान्यता दिल्यानंतर गेल्या आठवड्यात दुर्गम भागात ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली होती. ड्रोनची खास रचना त्यासाठी करण्यात आली होती. पण कंपनीने घेण्यात आलेल्या चाचण्या कुठे घेण्यात आल्या याबाबतची अधिक माहिती दिली नाही.

१३ मे रोजी ड्रोनसाठी इच्छुक असलेल्या कंपन्यांकडून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने अर्ज मागविले होते. ग्राहकापर्यंत अन्न पोहोचविण्यासाठी लागणारा सरासरी वेळ ३० टक्क्यांवरून १५ मिनिटापर्यंत करण्यासाठी हवाई मार्ग हा एकमेव पर्याय आहे. रस्ते वेगवान डिलिव्हरी करण्यासाठी कार्यक्षम नाहीत, असे झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दिपिंदर गोयल यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, आम्ही शाश्वत आणि सुरक्षित तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी काम करत आहोत. त्यासाठी पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ड्रोनद्वारे अन्न पोहोचविणे हे आता स्वप्न राहिलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

५ किलोपर्यंतचे अन्न हायब्रीडच्या प्रकारच्या ड्रोनमध्ये घेवून जाता येते. ड्रोन पूर्णपणे स्वयंचलित आहे. प्रत्येक ड्रोनची सुरक्षेसाठी झोमॅटोकडून चाचणी घेण्यात येत आहे. झोमॅटोने ड्रोन सेवेसाठी ‘टेकइगल’ ही लखनौमधील ड्रोन स्टार्टअप कंपनी ताब्यात घेतली आहे. सध्या दुचाकीवरून ग्राहकापर्यंत अन्न पोहोचविण्यासाठी कंपनीला ३० मिनिटे लागत आहेत. रस्त्यावरील वाढती वाहतूक, अरुंद रस्ते आणि प्रदूषण याचा विचार करता ड्रोनद्वारे अन्न पोहोचविण्याची सुविधा महानगरांसाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.

Leave a Comment