अचानक गायब झालेली ही विमाने कधीच परतली नाहीत


आजच्या धकाधकीच्या युगामध्ये एक एक मिनिट फार महत्वाचे झाले आहे. म्हणूनच एका जागेहून दुसऱ्या जागी पोहोचण्यासाठी आता हवाई मार्गाचा पर्याय निवडला जाऊ लागला आहे. प्रवासासाठी लागणारा वेळ यामुळे वाचवता येतो. रस्त्या वरच्या ट्रॅफिक इतकाच हवाई ट्रॅफिक ही आता वाढायला लागला आहे. अमेरिकेमध्ये दर वर्षी ६३१,९३९,८२९ इतक्या प्रचंड संख्येत प्रवासी हवाई यात्रा करीत असतात असे तेथील ब्युरो ऑफ ट्रान्सपोर्ट चा अहवाल सांगतो. या सगळ्या घाई – गर्दीमध्ये काही प्रवासी विमाने कुठलाही मागमूस न ठेवता गायब झाल्याच्या घटनाही आपण अधून मधून ऐकत राहतो. खरे तर ही विमाने चालविणारे वैमानिक उत्तम प्रशिक्षण घेतलेले आणि विमाने चालविण्याचा मोठा अनुभव घेतलेले असतात. पण तरीही असे अनुभवी वैमानिक असून देखील विमाने अचानक गायब होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही, तसेच प्रवाश्यांसकट गायब झालेले विमान नक्की गेले कुठे आणि ते परत कधीच का आले नाही हे ही मोठे गूढ होऊन बसले आहे. अश्याच काही अचंब्यात टाकणाऱ्या या घटना..

२५ मे, २००३ साली अमेरिकन एअरलाईन्सचे बोईंग ७२७-२२३ हे विमान अंगोला मधल्या क्वात्रो द फवेरीएरो या विमानतळाहून उड्डाण करत असताना रन वे वरच वेडेवाकडे चालताना पाहून कंट्रोल टॉवर मधील कर्मचाऱ्यांनी विमानातील कर्मचाऱ्यांशी तसेच वैमानिकंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. काही सेकंदांच्या अवधीमध्ये विमाने उड्डाण केले. उड्डाण करताना विमानाचे दिवे चालू असावे लागतात. पण या विमानाचे दिवे आणि ट्रान्सपॉन्डर दोन्हीही बंदच होते. आकाशामध्ये उड्डाण केल्या नंतर हे विमान कुठे गले याचा शोध आजतागायत लागू शकलेला नाही.

फ्लाईट १९, ही अॅवेंजर टोर्पिडो जातीच्या पाच लढाऊ विमानांची पूर्ण टीम ५ डिसेंबर १९४५ साली बर्म्युडा ट्रँगल च्या जवळ गायब झाली. अमेरीकेमधील फ्लोरिडा येथील विमानतळावरून या पाचही विमानांनी उड्डाण केले होते. त्यानंतर ही पाचही विमाने कुठे गायब झाली त्याचा पत्ता आजपर्यंत लागू शकलेला नाही. समुद्रामध्ये विमाने कोसळली असण्याची शक्यता लक्षात घेऊन समुद्रामध्ये ही कैक दिवस शोधकार्य सुरु होते, पण या विमानांचे कुठल्याही प्रकारचे अवशेष कधी सापडलेच नाहीत. कंट्रोल टॉवर मध्ये शेवटचे ऐकू आलेले वैमानिकांचे संभाषण लक्षात घेतल्यास, त्या सर्वच वैमानिकांना आपापल्या विमानांमध्ये काहीतरी यांत्रिक बिघाड होत असल्याचे जाणविल्याचे समजते. पण त्यानंतर संभाषण तुटल्यामुळे पुढे नक्की काय झाले, सर्वच्या सर्व विमाने एकाच वेळी कशी काय गायब झाली, याचा शोध आजही लागू शकलेला नाही. त्याचबरोबर सर्व विमानांमध्ये एकाच वेळी यांत्रिक बिघाड होण्याचे कारण, बर्म्युडा ट्रँगल मधील चुंबकीय क्षेत्र असेल का हा ही शोध केला गेला. पण त्यातून पुढे कसलेच निष्पन्न झाले नाही.

अगदी अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे २०१४ साली मलेशियन एअरलाईन्स चे बोईंग ७७७ हे विमान त्यातील २३९ प्रवासी आणि विमानातील कर्मचारी दलासकट गायब झाले. असे म्हटले जाते की वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटल्याने हे विमान अपघातग्रस्त झाले. पण तसा कुठला ही विश्वसनीय पुरावा अजून सामोर आलेला नाही. हे विमान गायब झाल्याच्या वर्षभरानंतर पर्यंत या विमानासाठी शोध मोहीम सुरु होती. पण अखेर वर्षभरानंतर हे शोधकार्य थांबविण्यात आले. आजतागायत या विमानाचे समजले जाणारे ३३ लहान मोठे तुकडे सापडले आहेत, पण विमान कोसळले असेल तर ते नेमके कुठे ती जागा अजूनही समजू शकलेली नाही.

अँटोनोव्ह ए एन ३२ हे भारतीय वायुसेनेचे विमान त्यातील प्रवासी आणि वैमानिकांसकट २२ जुलै २०१६ मध्ये बंगाल च्या उपसागरावर गायब झाले. रडार वर दिसत असलेले हे विमान सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी अचानक दिसेनासे झाले. कंट्रोल टॉवरशी असणारा त्याचा संपर्कही तुटला. त्यानंतर भारतीय नौसेना, वायुसेना आणि तट रक्षक दल यांनी या विमानाचा थांगपत्ता लावण्यासाठी शोधमोहीम सुरु केली. पण आजपर्यंत या विमानाचा शोध लागू शकलेला नाही.

Leave a Comment