ह्या जीवांकडे आहेत अद्भुत शक्ती..!


अद्भुत शक्टी असणाऱ्या सुपर हिरोजचे कितीतरी चित्रपट आपण पाहिले आहेत. जगाच्या रक्षणाकरिता हे सुपर हिरोज आपल्या अद्भुत शक्तींचा वापर करताना पाहायला मिळतात. पण हे सुपर हिरोज ही वास्तविकता नसून केवळ काल्पनिक आहेत हे ही आपल्याला ठाऊक असते. पण या जगामध्ये काही जीव असे आहेत, ज्यांना निसर्गानेच अद्भूत शक्तींचे वरदान दिले आहे.

अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये अनेक चित्रविचित्र जीव सापडतात. यामध्ये हेअरी फ्रॉग नामक बेडकांची प्रजाती आहे. ह्या बेडकांचे पंजे त्यांच्या शरीराच्या आतमध्ये असून, शिकार करताना हे पंजे बाहेर येतात, तसेच स्वतःचे रक्षण करण्यासाठी देखील हे बेडूक पंजे बाहेर काढतात. त्यानंतर हे पंजे पुन्हा बेडकाच्या शरीराच्या आत लुप्त होतात. प्लम थीफ नामक कोळ्यासारखा दिसणारा जीव, स्वतःच्या आकारापेक्षा मोठ्या जनावराला देखील मारू शकतो. ह्या जीवाच्या पंजांमध्ये भयंकर ताकद असते. कुत्र्याच्या आकाराच्या जनावराला हा जीव केवळ आपल्या पंजाच्या घट्ट विळख्याने मारू शकतो.

ईम्मॉर्टल जेलीफिश ह्या जीवाला निसर्गाने अमरत्वाची सुपर पावर दिली आहे. ज्याप्रमाणे साप कात टाकतात, त्याचप्रमाणे हे जेलीफिश एका शरीराचा त्याग करून दुसरे शरीर तयार करू शकतात. हे जेलीफिश म्हातारे झाले, किंवा आजारी झाले, तर अश्याप्रकारे एका शरीराचे त्याग करून दुसरे शरीर तयार करू शकतात. त्यामुळे ह्या जेलीफिशला कधीही मरण येत नाही. म्हणूनच याला immortal, म्हणजे अमर म्हटले गेले आहे.

फ्लाईंग स्क्विड हा समुद्री जीव पाण्यामध्ये पोहू शकतोच , पण त्याशिवाय हवेमध्ये उडण्याची अभूतपूर्व शक्ती निसर्गाने या जीवाला दिली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास पूर्ण करण्यासाठी हा जीव पाण्यामध्ये पोहोतो आणि हवेमध्ये उडतो देखील. तसेच समुद्रामध्ये राहणारा मिमिक ऑक्टोपस हा जीव आपल्या आसपासच्या वातावरणानुसार आपले रूप बदलू शकतो. त्यामुळे हा जीव दिसता दिसता अचानक गायब झाल्याचा भास होतो. पण खरेतर त्याच्या आसपासच्या वातावरणानुरूप स्वतःचे रूप बदण्याची अद्भुत शक्ती या जिवामध्ये आहे.

Leave a Comment