चिकन आवडीने खाणाऱ्यांनी राहा सावध…!


आपल्यापैकी अनेक जण आवडीने चिकन आणि चिकन पासून तयार केलेल्या पदार्थांवर अगदी मनापासून ताव मारीत असतात. पण चिकन खाताना, ते ज्या कोंबडीपासून आले, ती कोंबडी कशी वाढविली गेली असेल, याचा विचार आपण अभावानेच करीत असतो. पण असा विचार करणे आता गरजेचे होत चालल्याचे एका शास्त्रीय शोधाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. आजकाल कोंबड्या वाढविताना त्यांच्यावर अनेक अँटी बायोटिक्सचा वापर केला जात असून, वापरल्या गेलेल्या औषधांचा त्यांच्यावर आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या अंड्यांवर त्याचे दुष्परिणाम होत असतात. याच कोंबड्यांपासून आलेले चिकन आणि अंडी जर खाल्ली गेली, तर कोंबड्यांसाठी वापरल्या गेलेल्या औषधांचा मानवी शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. जास्त पैसे कमावून, आपल्या फायद्यासाठी काही कुक्कुटपालक कोंबड्यांवर तऱ्हे-तऱ्हेच्या औषधांचा वापर करीत असतात. या औषधांमुळे कोंबडी आकाराने मोठी दिसू लागते, त्यामुळे बाजारामध्ये अश्या कोंबड्यांना चांगला भाव मिळतो. पण अश्या औषधांच्या अति वापराने अनेक कोंबड्या दगावल्या देखील आहेत, इतकी ही औषधे हानिकारक आहेत. अशी औषधे वापरून वाढविलेल्या कोंबड्यांपासून आलेले चिकन आणि अंडी खाणे धोकादायक ठरू शकते.

जर औषधांचा वापर केल्याने वाढलेल्या कोंबडीपासून आलेले चिकन नियमित खाल्ले गेले, तर त्या औषधांमुळे मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती नाहीशी होऊ लागते. अश्या वेळी कोणतेही आजारपण आले, तर त्यानंतर घेतलेल्या औषधांचा ही शरीरावर इच्छित परिणाम होऊ शकत नाही. औषधांचा उपयोग करून वाढविलेल्या कोंबडीपासून आलेले चिकन खाल्याने कर्करोग होण्याची देखील शक्यता असते.

ही समस्या सोडविण्यासाठी शासनातर्फेही अनेक उपाययोजना लागू केल्या जात आहेत. स्वास्थ्य मंत्रालयाने ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रेग्युलेशन्स’ च्या कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी पावले उचलली असून, या द्वारे प्राण्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांवर आणि औषधे वापरण्याच्या प्रमाणावर नवे निर्बंध घालण्याचा विचार सुरु आहे. आधीच्या कायद्यानुसार कोंबड्यांसाठी ३७ प्रकारची अँटीबायोटिक्स आणि ६७ प्रकारची इतर व्हेटर्नरी औषधे वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र या औषधांचे प्रमाण किती असावे, हे निश्चित करण्यासाठी कोणतेही ठोस नियम नव्हते. आता कायद्यामध्ये बदल करतना या बाबींचा देखील नव्याने विचार केला जात आहे.

Loading RSS Feed
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment