सौदी सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या 10 वर्षाच्या मुलाला फाशी?


रियाध : सौदी अरेबियात मुर्तझा कुरेसिस ज्याचे वय सध्या 18 वर्षे आहे, तो वयाच्या 10 व्या वर्षीच तेथील हिरो बनला होता. मुर्तझाची अरब स्प्रिंग म्हणजेच सौदी क्रांतीच्या वेळी राजकीय समज मोठी होती. मुर्तझाने 2011 मध्येच मानवाधिकाराच्या मागणीसाठी त्याच्या 30 मित्रांसह सायकल रॅली काढली होती. पण सरकारचा शिया कुटुंबातील असलेल्या मुर्तझाच्या आंदोलनाने संताप झाला आणि त्याचा पाठलाग सुरु झाला.

सौदीतील बहरीनमधील रस्त्यावर अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झाल्यानंतर मुर्तझाला अटक करण्यात आली. तो तेव्हापासून अजूनही पोलिसांच्या अटकेत आहे. मुर्तझाला चार वर्ष खटला चालल्यानंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वात छोटा राजकीय कैदी असेही मुर्तझाला म्हटले जाते.

मुर्तझाची लढाई सौदीच्या रॉयल फॅमिलीशी होती. 11 वर्षांचा असताना सौदीच्या पोलिसांनी मुर्तझाच्या भावाची हत्या केली होती. भावाच्या अंत्ययात्रेला रॉयल फॅमिलीविरोधातील रॅली म्हणून संबोधण्यात आले. मुर्तझा आणि त्याचा भाऊ ज्या चळवळीशी जोडलेले होते, त्याला दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले.

मुर्तझावर जवळपास पाच वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर आताही फाशीच्या शिक्षेची टांगती तलवार आहे. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह सुळावर लटकवला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याने भावासोबत मिळून अवामिया या शहरातील एका पोलीस स्टेशनवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप मुर्तझावर आहे. या शिवाय दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग, पेट्रोल बॉम्ब तयार करणे, पोलिसांवर गोळीबार असे विविध आरोप आहेत. सौदीच्या कायद्यानुसार या गुन्ह्यांना मृत्यूदंडाची शिक्षा आहे. सौदीमध्ये सरकारविरोधात आंदोलन करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.

एमनेस्टी आणि रिप्रीव यासारख्या मानवाधिकार संघटना मुर्तझा कुरेसिसला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्या आहेत. सौदी अरेबिया सरकारवर तीव्र शब्दात टीका केली जात आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार 18 वर्षे वयाच्या आत केलेल्या गुन्ह्यांसाठी मृत्यूदंड दिला जाऊ शकत नाही, असे एमनेस्टी इंटरनॅशनलचे म्हणणे आहे.

Leave a Comment