ताडोबाचे सौंदर्य पाहून भारावला ब्रायन लारा


चंद्रपूर – माजी क्रिकेटपटू ब्रायन लारालाही ताडोबाच्या निसर्गसौंदर्य आणि जंगल सफारीची भुरळ पडली आहे. त्याने ताडोबातील अनुभव हा आनंदाची पर्वणी असल्याचे ट्विट केले आहे. ताडोबाचा वाघ पाहण्यासाठी मंगळवारपासून ब्रायन लारा हा ठाण मांडून आहे.

चक्क ४५ डिग्री अंश सेल्सियस तापमानात भारताच्या मध्यभागी (ताडोबा व्याघ्रप्रकल्प) दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी जायचे ठरवले. पण ताडोबा अभयारण्य म्हणजे आनंदाची पर्वणीच, या शब्दात माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याने ताडोबातील अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे.


स्वसरा रिसॉर्ट येथे ब्रायन लारा हा थांबला असून त्याने दरम्यान जंगल सफारीचा आनंद लुटला. त्याला यावेळी वाघाचे आणि सांबराचे दर्शन झाले. त्याने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. विश्रांतीसाठी ताडोबा अभयारण्यात जाण्याचे लारा याला प्रसिद्ध गोलंदाज अनिल कुंबळे याने सुचविले. यापूर्वी अनिल कुंबळे येथे आला होता. ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे सौंदर्य आणि जैवविविधता पाहून तो भारावून गेला होता.

ब्रायन लारा याचेही असेच काहीसे झाले आहे. लाराने आपल्या कुटुंबियांसह जंगल सफारीचा आनंद लुटला. यादरम्यान कैद केलेले चार फोटो ब्रायनने ट्विटरवर शेअर केले आहेत. एकूणच ताडोबाचे सौंदर्य पाहून लारा खूश झाल्याचे ट्विटमधून दिसून येत आहे. लारा आज सकाळी पुन्हा जंगल सफारी करणार आहे.

Leave a Comment