शहाणा सोन्या बैल बनला गावाचे भूषण


सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या कलमवाडी गावातील सोन्या नावाचा एक बैल या गावासाठी भूषण बनला आहे. गेले काही दिवस हा बैल खूपच चर्चेत असून गावकरी त्याच्याबरोबर फोटो आणि व्हिडीओ कडून घेत आहेत. आपण सर्वसाधारणपणे कमी समज असलेल्या माणसाना बैलोबा म्हणतो पण सोन्या बैल मात्र माणसांपेक्षा कांकणभर अधिकच हुशार असून त्याची ही हुशारीच गावासाठी अभिमानाची गोष्ट बनली आहे.

शिवाजी साळुंखे यांच्या घरातील या बैलाला हाकण्याची गरज पडत नाही. तो रोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा २०० लिटर दुधाचे कॅन बैलगाडीतून ३ किमी वर असलेल्या डेअरी पर्यंत एकटाच नेतो आणि रिकामे कॅन घेऊन घरी परत येतो. वाटेत रस्त्यात गाडी अथवा दुसरे वाहन आले तर रस्त्याच्या कडेला जाऊन त्या वाहनाला रस्ता देतो आणि वाहन गेले कि पुन्हा रस्त्यावर येऊन मार्गक्रमणा करतो. गावकऱ्यांना हे दृश इतके नेहमीचे झाले आहे कि एखादादिवस सोन्याला उशीर झाला तर गावकरी चिंतेत पडतात.

शिवाजी साळुंखे सांगतात सोन्याच्या जन्म त्यांच्या घराच्या गाईच्या पोटीच झाला आहे त्यामुळे जन्मापासून तो आमच्या घराशी जोडलेला आहे. शिवाजी यांना तीन भाऊ आहेत पण शिवाजी यांचे वडील सोन्याला त्यांच्या पाचवा मुलगा मानतात. घरी १० एकर शेती, ४० जनावरे आहेत पण त्यातल्या कुणालाच सोन्याची सर नाही. शिवाजी सांगतात एकदा बैलगाडीतून ते दुध घालण्यासाठी डेअरी मध्ये चालले होते तेव्हा रस्त्यात वैरण खरेदी करण्यासाठी उतरले. तोपर्यंत सोन्या डेअरी मध्ये पोहोचला होता. मग हेच वळण पडून गेले.

Leave a Comment