वर्ल्ड कप सट्टा बाजाराला चढला रंग


इंग्लंडमध्ये होत असलेल्या आयसीसी वर्ल्ड कपचे सामने सुरु होऊन आता दोन आठवड्याचा कालावधी झाला आहे आणि प्रत्येक टीमचे दोन अथवा अधिक सामने झाले आहेत. या संघांची कामगिरी पाहून जगभरातील सटोडिये सक्रीय झाले आहेत आणि सट्टा बाजाराला आता रंग चढू लागला आहे. मात्र यात मुख्य अडचण अशी आहे कि यंदा ही स्पर्धा राउंड रॉबिन फॉर्मेट मध्ये होत आहे त्यामुळे यंदा कोणती टीम सट्ट्याच्या दृष्टीने फेव्हरीट ठरेल याचा अंदाज बांधणे अवघड आहे. वर्ल्ड कप मध्ये सामील असलेल्या १० टीम पैकी कोणत्या टीम अंतिम चार मध्ये येतील हे आत्ताच सांगता येणार नाही तरीही सट्टा बाजारात इंग्लंड आणि भारत या फेव्हरीट टीम ठरल्या आहेत.

सट्टा बाजारातील बुकींच्या मते इंग्लंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया या फेव्हरीट टीम आहेत कारण ऑस्टेलियाकडे कठीण परिस्थितीत सामना जिंकण्याचे कौशल्य आहे. ती कला या संघाला चांगलीच अवगत आहे. सध्या यजमान इंग्लंडने तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत आणि त्यांच्यासाठी दोनास एक असा भाव फुटला आहे तर भारत दोन नंबरवर असून त्यांना तीनस एक भाव आहे. विराट कोहलीची बॅटिंग मजबूत असून टीम इंडियाने द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला हरविले आहे.


सट्टा बाजारात तीन नंबरवर ऑस्ट्रेलिया आहे. त्यांचा भाव सातास एक असा आहे. मात्र कोणतीही मॅच अवघड परिस्थितीत जिंकण्याची या संघाची क्षमता आहे. द. आफ्रिकेसाठी नवास एक असा भाव आहे आणि हा संघ आत्तापर्यंतचे सर्व तीन सामने हरला आहे. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तरीही बुकींचा या संघावर भरवसा आहे. त्यांची गोलंदाजी मजबूत आहे त्यामुळे ते कधीही वापसी करण्यास सक्षम आहेत.

पाचव्या स्थानी न्यूझीलंड टीम असून त्यांच्यासाठी बारास एक असा भाव आहे. तर सहाव्या नंबरवर वेस्ट इंडीज टीम असून त्यांना सोळास एक असा भाव आहे. या टीमचा फॉर्म आत्ता तरी फारसा चांगला नाही. सात नंबरवर पाकिस्तान टीम आहे. त्यांना विसास एक भाव मिळाला असून टीम चांगली असली तरी तिचे प्रदर्शन अनियमित राहिले आहे. बांगलादेश देश या यादीत आठ नंबरवर असून त्यांना १२५ ला एक असा भाव आहे. २०१५ च्या वर्ल्ड कप मध्ये या टीमने खूपच प्रगती केली होती मात्र त्यानंतर त्यांच्या खेळात खूप सुधारणा झालेली नाही.

श्रीलंका यंदा खूपच कमजोर भासत आहे. त्यांना सट्टे बाजारात १५० ला एक असा भाव आहे. आत्तापर्यंत झालेल्या तीन सामन्यात त्यांना एक विजय मिळाला आहे. सर्वात खालच्या नंबरवर अफगाणीस्तानची टीम असून त्यांना अडीचशे साठी एक असा भाव आहे. हा संघ यंदा दुसरा वर्ल्ड कप खेळत आहे. भारतात सट्टा बाबत पोलीस अधिक सतर्क झाले असले तरी सटोडिये सक्रीय असून भारत पाक सामन्यावर सर्वाधिक बेटिंग केले जाईल असा अंदाज आहे.

Leave a Comment