रामदेवबाबांच्या पतंजलीला उतरती कळा


योगगुरू रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी गेल्या काही वर्षात पतंजली आयुर्वेद कंपनीला मिळवून दिलेली लोकप्रियता आणि व्यवसाय वाढ आता ओसरू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सरलेल्या वित्त वर्षात पतंजलीचा खप खूपच घसरला असल्याचे आकडेवारी सांगते आहे. रामदेवबाबांनी एका मुलाखतीत २०१७ मध्ये कंपनीचा टर्नओव्हर येत्या वर्षात २० हजार कोटींवर नेणार असल्याचे आणि भल्या भल्या मल्टीनॅशनल कंपन्यांना कपालभाती करण्याची पाळी आणणार असल्याचे सांगितले होते मात्र वास्तवात या वर्षात पतंजलीच्या उलाढालीत १० टक्के घट दिसून आली आहे.


गेल्या तीन वर्षात पतंजलीची व्यवसाय वाढ प्रचंड वेगाने झाली होती. हा वेग इतका होता कि जगभरातील व्यवसाय विश्लेषक त्यामुळे आश्चर्यात पडले होते. मात्र रॉयटरच्या अहवालानुसार पतंजलीची उलाढाल गेल्या वित्त वर्षात ८१०० कोटींवर महणजे गतवेळच्या तुलनेत १० टक्के कमी झाली तर डिसेंबर २०१९ पर्यत ४७०० कोटींवर घसरेल असे संकेत दिले गेले आहेत.

पतंजलीमधील कर्मचारी, मालपुरवठादार, वितरक, स्टोअर मॅनेजर्स या संदर्भात अनेक कारणे सांगत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार व्यवस्थापना कडून काही चुकीची पाउले टाकली गेली आहेत. वेगाने विकास करण्याच्या नादात गुणवत्तेकडे लक्ष दिले गेले नाही तर काहीच्या मते नोटबंदी आणि जीएसटीचा विपरीत परिणाम व्यवसायावर झाला आहे. सुरवातीला रामदेवबाबांनी पतंजली उत्पादने स्वदेशी भावनेशी जोडून लोकांसमोर सादर केली आणि ग्राहकांचा विश्वास मिळविला. पतंजली खोबरेल, पेस्ट, सौंदर्य प्रसाधने आणि आयुर्वेदी औषधे यांनी विदेशी कंपन्यांपुढे तगडे आव्हान उभे केले होते.


ग्राहकांकडून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून कंपनीने वेगाने विस्तार करण्याची योजना आखली आणि त्याप्रमाणे पाउले टाकली पण त्यात मालाची गुणवत्ता घसरली आहे. कंपनीकडे विक्रीवर नजर ठेवणारे सॉफटवेअर नाही. तसेच वाहतूकदारांबरोबर दीर्घकालीन करार केले गेले नाहीत याचा परिणाम खप कमी होण्यावर झाला आहे. कंपनीचे प्रमुख आचार्य बाळकृष्ण यांनी कंपनीचा वेगाने विस्तार झाल्यामुळे काही अडचणी आल्या असे मान्य केले असून या सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत आणि कंपनी पुन्हा मोठ्या उलाढालीसाठी तयार झाली असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment