जेवण करताना स्मार्टफोनचा वापर टाळण्यासाठी या रेस्टॉरंटचा अनोखा निर्णय


आपल्या जीवनातील स्मार्टफोन हा एक अविभाज्य घटक बनला असून आपण फिरायला जाताना, खाताना सतत बाकीच्या कामापेक्षा स्मार्टफोनला सर्वाधिक महत्व देत असतो. अनेकवेळा स्मार्टफोनवरुन घरातल्यांचा ओरडा खायला लागतो. दरम्यान, अमेरिकेतील एका रेस्टॉरंटने खाताना स्मार्टफोनचा वापर टाळण्यासाठी अनोखा उपक्रम सुरु केला आहे. खाताना फोनचा वापर न करणाऱ्यांना मोफत पिझ्झा देण्याचे या रेस्टॉरंटमध्ये जाहीर केले आहे.

यासंर्दभात अमेरिकेतील फॉक्स वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या ग्राहकांना स्मार्टफोनचा वापरण्यापेक्षा एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उपक्रम कॅलिफोर्नियामधील एका रेस्टॉरंटने हाती घेतला आहे. करी पिझ्झा कंपनीने यासाठी ‘टॉक टू एव्हरीवन डिस्काउंट’नुसार कमीत-कमी चार जणांच्या समूहाला मोफत पिझ्झा देण्याचे जाहीर केले आहे. पण स्मार्टफोनचा वापर खाताना करु नये असे सांगितले आहे.

रेस्टॉरंटमध्ये कमीत-कमी चार जण एकत्र आल्यानंतर ते आपले स्मार्टफोन येथील लॉकरमध्ये लॉक करु शकतात. त्यांनी जर स्मार्टफोनशिवाय आपले संपूर्ण खाद्यपदार्थ संपविले, तर दुसऱ्यावेळेला त्यांना मोफत पिझ्झा मिळू शकतो किंवा पिझ्झा ते घरी घेऊन जावू शकतात. याशिवाय, पिझ्झा ते बेघर लोकांना दान करु शकतात.

याबाबत रेस्टॉरंटच्या फेसबुक पेजवर म्हटले आहे की, खाताना स्मार्टफोनचा वापर कुटुंबाने किंवा मित्रांनी टाळावा, आमचे यासाठी प्रयत्न आहे. तसेच, एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. तुम्ही स्मार्टफोनशिवाय आपले संपूर्ण खाद्यपदार्थ जर संपविले, तर दुसऱ्यावेळी तुम्हाला मोफत पिझ्झा मिळू शकतो किंवा हा पिझ्झा तुम्ही बेघर लोकांना दान करु शकता.

Leave a Comment