नथुराम गोडसे, साध्वी प्रज्ञासारखे लोक मदरशात जन्माला येत नाहीत – आझम खान


नवी दिल्ली – आपल्या आणखी एका वक्तव्यामुळे नेहमीच विवादास्पद वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान हे सध्या चर्चेत आले आहेत. नथुराम गोडसे आणि प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारखे लोक मदरशांमध्ये जन्माला येत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोदींची मदरशांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्याची योजना आहे. आझम खान त्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, की गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे आणि प्रज्ञा सिंह ठाकूर सारखे लोक मदरशांमध्ये जन्माला येत नाहीत. सर्वप्रथम नथुराम गोडसेच्या विचारसरणीचा प्रचार करणाऱ्यांना देशद्रोही घोषित करण्यात यावे. दहशतवादी कारवायांमध्ये दोषी ठरवल्या गेलेल्या आरोपींना बक्षिस देणे बंद करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रज्ञा ठाकूर या २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असून सध्या त्या जामिनावर बाहेर आहे. त्याचबरोबर त्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडूण आल्या आहेत. त्यांनी प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत त्यांच्यावर टीका झाली होती. त्यांनी नथुराम गोडसेला देशभक्त संबोधले होते.

मदरशांना केंद्र सरकारला जर मदतच करायची असेल तर मदरशांची अवस्था त्यांनी सुधारली पाहिजे. धार्मिक शिक्षण मदरशांमध्ये दिले जाते. पण तेथे इंग्रजी, हिंदी आणि गणित हे विषयही शिकवले जातात. मदरशांना मदत म्हणून त्यांच्या सोयीसुविधांचा स्तर वाढवला पाहिजे. नविन इमारती स्थापन केल्या पाहिजे, असे आझम खान यावेळी म्हणाले. आझम खान यांनी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंगळवारी घोषित केलेल्या या योजनेला विरोध केला असला तरी अनेक मुस्लीम तत्ववेत्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Leave a Comment