मार्केट रिसर्चसाठी फेसबुकने आणले नवीन अॅप


मार्केट रिसर्चसाठी नुकतेच एक नवीन अॅप फेसबुकने लाँच केले आहे. एखादा युजर मोबाईलमध्ये कोणते अॅप वापरतो याची माहिती या अॅपद्वारे फेसबुककडून गोळा केली जाणार आहे. त्याचबरोबर फेसबुक ही माहिती शेअर करण्यासाठी पैसे देणार आहे.

सध्या स्पर्धेत टिकण्यासाठी ऑनलाईन विश्वातील प्रत्येक कंपनी युजर्सला नवीन नवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे. मार्केट रिसर्च करुन लोकांना नवीन काय देता येईल याबाबत फेसबुकही माहिती घेत असते. फेसबुककडून यासाठी यापूर्वी दोन अॅप लाँच करण्यात आले होते. हे दोन अॅप मोबाईल युजर्स त्यांच्या फोनवर काय काय करतात याची माहिती मिळवण्याचे काम करत होते. पण युजर्सच्या प्रायव्हसीला त्यामुळे धोका असल्याची या अॅपवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर ते बंद करण्यात आले.

आता फेसबुककडून यासाठी नव्याने ‘स्टडी’ नावाचे एक अॅप लाँच करण्यात आले आहे. केवळ ‘प्ले स्टोअर’वर हे अॅप सुरुवातीला उपलब्ध असणार आहे. तुमच्या फोनमध्ये तुम्ही कोणकोणते अॅप्स वापरता, किती वेळेसाठी वापरता, कोणत्या फिचर्सचा वापर करता याची माहिती हे नवीन अॅप गोळा करेल. यामुळे फेसबुकला इतर कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठीची माहिती मिळवता येणार आहे.

कोणतेही पासवर्ड किंवा अकाउंटची माहिती या अॅपद्वारे गोळा करण्यात येणार नाही असे फेसबुककडून सांगण्यात येत आहे. ते अॅप तुमच्या फोनमधील फोटोज किंवा इतर संवेदनशील माहिती देखीलजमा करणार नाही. काही तज्ज्ञांकडून या अॅप बाबतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. प्रायव्हसी या अॅपमुळे धोक्यात येऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे. हे अॅप नेमकी काय माहिती पाठवणार आहे याची युजर्सला कल्पना नसणार, त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकांना या अॅपद्वारे जाहिराती दाखवण्यात येणार नाहीत. तसेच अॅपद्वारे जमा केली जाणारी माहिती इतर कंपन्यांना देण्यात येणार नाही, असंही फेसबुककडून सांगण्यात येत आहे. हे अॅप सुरुवातीला भारतात आणि अमेरिकेत लाँच करण्यात येणार आहे. या अॅपद्वारे लोकांना नेमके किती पैसे देण्यात येतील त्याबद्दल कोणतीही माहिती आणखी देण्यात आलेली नाही.

Leave a Comment