लायगर – वाघ आणि सिंहाच्या संकरातून जन्मलेला प्राणी


अनेक प्राण्याचे संकर करून नवीन प्राणी जन्माला येत असतात. घोडा आणि गाढव यांच्या संकरातून म्हणजे क्रॉसब्रीडिंग मधून जन्माला येणारा खेचर हा प्राणी कित्येक शतके माणसाच्या वापरत असून पहाडी भागात तो सामान तसेच माणसे वाहून नेण्यासाठी वापरला जातो. त्याच धर्तीवर वाघ आणि सिंह यांच्या संकरातून जन्माला आलेल्या अपोलो नावाच्या एका लायगर किंवा मराठीत सिंघ नावाच्या प्राण्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून या अपोलोचे वजन ३१९ किलो आणि उंची १२ फुट आहे. रिअर टारझन नावाच्या युट्युब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर केला गेला असून त्यात माईक होल्स्टन आणि कॉडी अँटल हे दोघे वन्य प्राणी संदर्भातील प्रोफेशनल दिसत आहेत.


अपोलोला सध्या अमेरिकेतील साउथ कॅरोलिनामध्ये मार्टल बीच सफारी मध्ये ठेवले गेले आहे. त्याला पाहून इतका मोठा प्राणी खरोखरच असतो यावर विश्वास ठेवणे भाग आहे. हा प्राणी ताशी ६४ किमी वेगाने पळू शकतो. मात्र हा शिकारी प्राणी नाही. अर्थात तो क्वचित शिकार करतोही पण प्रामुख्याने लायगर खासगीरित्या अथवा प्राणी संग्रहालयात पाळले जातात.


मिळालेल्या माहितीनुसार हा प्राणी नर सिंह आणि वाघीण यांच्या संकरातून जन्माला येतो पण हे केवल अपघाताने किंवा जाणून बुजून केलेले ब्रीडिंग असते. लायगरचे तोंड सिहासारखे मोठे असते आणि अंगावर फिकट रंगाचे वाघासारखे पट्टे असतात. नर लायगरला सिंहासारखी आयाळ असते पण ती कमी प्रमाणात असते. लायगर सिंहाप्रमाणे डरकाळी फोडतो. यांचे आयुष्य १५ ते २५ वर्षाचे आणि लांबी ९ ते १२ फुट व वजन ३२० ते ५५० किलो पर्यत असते. हरणासारखे प्राणी ते खातात पण शिकार करण्यास फारसे उत्सुक नसतात. त्यांना वाघाप्रमाणे पोहणे आवडते, सिंहाला पाण्यात उतरणे फारसे आवडत नाही. भारतात १९२० च्या दशकात लायगर सापडले आहेत मात्र ते तसे दुर्मिळ आहेत.


जगात साधारणपणे असे १०० लायगर असावेत असा अंदाज असून त्यांची संख्या अमेरिकेत अधिक आहे. त्यातील ३० अमेरिकेत खासगी मालकीचे असून चीन मध्ये २० लायगर आहेत असे सांगितले जाते. लायगरना व्यायाम कमी होतो त्यामुळे ते अधिक वजनदार होतात. वाघिणीला अनेकदा या पिलांना जन्म देताना सिझेरियन करण्याची गरज पडते असेही समजते.

नर वाघ आणि सिंहीण यांच्या संकारातुनही पिले जन्माला येतात त्यांना टायगन म्हटले जाते. लायगर च्या तुलनेत टायगन आकाराने खूपच लहान असतात.

Leave a Comment