लदाखमधील सिंधू महोत्सव सुरु


काश्मीरच्या दुर्गम तरीही निसर्गसुंदर अश्या लदाख जिल्यात दरवर्षी साजऱ्या होत असलेल्या सिंधू फेस्टिव्हलची सुरवात १२ जून पासून झाली असून हा महोत्सव १४ जून पर्यंत सुरु राहणार आहे. हा महोत्सव १९९६ सालापासून सुरु केला गेला असून यंदा त्याचे २२ वे वर्ष आहे. सिंधू नदीकाठी रुजलेल्या सभ्यता, संस्कृती त्यांच्या सुंदर संगमाचे दर्शन या महोत्सवात घडत असते आणि त्यामुळे देश विदेशातून अनेक पर्यटक मुद्दाम या उत्सवासाठी लेह मध्ये येतात.


लेह पासून ८ किमीवर असलेल्या शे मानला या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. सिंधू ही भारताची पवित्र नदी मानली जाते आणि तिचा उगम मान सरोवरातून होतो. या सरोवरातून बाहेर पडून ती लदाख मध्ये प्रवेश करते आणि नंतर पाकिस्तान मध्ये जाते. वेद काळापासून या नदीचे अनेक उल्लेख सापडतात. तिला इंडस असे नाव दिले गेले होते आणि याच नदीवरून भारताला इंडिया नाव मिळाले असे सांगितले जाते. याच नदीकाठी पहिली मानवी संस्कृती जिला सिंधू संस्कृती म्हटले जाते ती रुजली होती. हिंदू धर्मात या पवित्र नदीच्या नुसत्या दर्शनाने सारे क्लेश संपतात आणि या नदीत स्नान केल्यास जन्मोजन्मीच्या पापांचा नाश होतो असे मानले जाते.


भारतातील ही मोठी नदी आहे आणि पवित्र मानली गेली आहे. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून या नदीत तर्पण करतात. सिंधू महोत्सवात हिंदू, सिंधी, बौद्ध, शीख असे सर्व धर्मीय लोक सामील होतात. अनेक भाविक त्यांच्या भागातील नदीतून पाणी आणून सिंधू नदीत ओततात. याला कावड आणणे असे म्हटले जाते. एकता आणि अखंडता याचे ते प्रतिक मानले जाते.


सिंधू महोत्सवाची सुरवात सिंधू नदीच्या पूजेने होते. त्यावेळी तिबेट अथवा अन्य बौद्ध लामा प्रार्थना करतात. त्यानंतर वेगवेगळ्या भागातून आलेले स्थानिक रहिवासी त्यांची परंपरागत नृत्ये, नाटके, गाणी सादर करतात. अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. रात्रीच्या निरव शांततेत धुनी चेतविली जाते. धुनी म्हणजे बॉनफायर. हा महोत्सव काश्मीर प्राईड म्हणून ओळखला जातो.

भारतात सिंधू नदीचे दर्शन फक्त इथेच होते. त्यामुळे लदाख पर्यटनाला जाणारे पर्यटक आवर्जून सिंधू नदी दर्शन करतात. सिंधू नदीचा महोत्सव, सीमा रक्षणासाठी बलिदान केलेल्या शूर वीराप्रती आदर आणि सन्मान दर्शविणारा म्हणूनही प्रसिध्द आहे.

Leave a Comment