तिने ऑनलाइन भीक मागून १७ दिवसात कमावले ३५ लाख


एका युरोपियन महिलेला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली संयुक्त अरब अमिरातमध्ये (युएई) अटक करण्यात आली आहे. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आपण स्वत: घटस्फोटीत पीडित असल्याचे सांगून निधी गोळा करत अनेकांची फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे. या महिलेने सोशल मीडियावर मी घटस्फोटीत आहे, माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी मला आर्थिक मदत करावी, अशी मागणी करत ५० हजार डॉलर (३५ लाख रुपये) जमवले. एवढी मोठी रक्कम अवघ्या १७ दिवसांमध्ये जमवल्यानंतर या महिलेचे सत्य अखेर समोर आल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात महिलेला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिचे नाव तसेच ती कोणत्या देशातील आहे यासंदर्भातील माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्टच्या माध्यमातून या महिलेने अनेकांना गंडा घातला. या महिलेने लोकांनी दिलेले पैसे गोळा करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइट्सवर अकाऊंट तयार केले. तिने या अकाऊंटवरुन आपल्या मुलांचे फोटो शेअर केले. तिने या फोटोबरोबर दिलेल्या माहितीमध्ये या मुलांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत मागितल्याची माहिती दुबई पोलीसांनी दिली.


आपली पत्नी अशाप्रकारे पैसे गोळा करत असल्याची कल्पना या महिलेच्या पतीला नव्हती. या मुलांना मदत करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याला अनेक मित्र आणि नातेवाईकांनी फोन करुन यासंदर्भात माहिती दिल्यानंतर आपल्या मुलांच्या फोटोचा वापरु करुन आपली पत्नी सोशल मिडियाच्या माध्यमातून भीक मागत असल्याचे समजले. जेव्हा महिलेला पोलिसांनी या प्रकरणात अटक केली तेव्हा तिच्या पतीने संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे सांगितले.

त्याने न्यायालयातही मुले माझ्यासोबत राहत असल्याचे पुराव्यासहीत सिद्ध केले. ही महिला खोटे बोलत असल्याचे पतीने सादर केलेल्या पुराव्यावरुन सिद्ध झाले. घरची आर्थिक परिस्थिती योग्य असतानाही नेटकऱ्यांना खोटी माहिती देत पैसे जमवण्यासाठी त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. दुबई पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भिकाऱ्यांबद्दल सहानुभूती ठेऊ नका असे आवाहन केले आहे. सोशल नेटवर्किंगवरुन येणाऱ्या प्रत्येक मजकुरावर विश्वास ठेऊ नका असे ट्विट दुबई पोलिसांनी केले आहे.

Leave a Comment