भारतात नाईकला योग्य प्रकारे न्याय मिळणार नाही – मलेशिया पंतप्रधान


मेलाका – वादग्रस्त इस्लामी उपदेशक झाकीर नाईक याचे भारताला प्रत्यर्पण न करण्याचा अधिकार मलेशियाला असल्याचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी म्हटले आहे. भारतात नाईक याला योग्य प्रकारे न्याय मिळणार नाही, असे मोहम्मद यांनी म्हटले आहे. अशाच प्रकारे कारण ऑस्ट्रेलियाने देऊन सिरुल अझहर उमर याचे २०१५ मध्ये मलेशियाला प्रत्यर्पण करण्यास नकार दिला होता.

ऑस्ट्रेलियाला सिरुल याचे मलेशियाला प्रत्यर्पण करावे, अशी विनंती आम्ही केली होती. पण त्याला आमच्या देशात थेट फाशी देण्यात येईल, अशा शंकेने हे प्रत्यार्पण करण्याचे त्यांनी नाकारले होते. झाकीर याला अशाच प्रकारे भारतात योग्य वागणूक दिली जाणार नाही, असे आम्हाला वाटते, असे मोहम्मद यांनी म्हटले आहे.

भारतात सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचे आणि सामाजिक सलोखा नष्ट करण्याचे आरोप झाकीर याच्यावर आहेत. याशिवाय त्याची भारत आणि बांगलादेशात घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणात संशयित म्हणून चौकशी सुरू आहे. जुलै २०१६ मध्ये ढाका येथील हॉली आर्टिसन बेकरी येथे झालेल्या स्फोटातील २ आरोपींनी नाईक याच्या उपदेशाने प्रभावित होऊन या कृत्यांमध्ये सहभाग घेतल्याचे कबूल केले आहे. या दोघांनी नाईक याचे फेसबुक आणि पीस टेलिव्हिजन चॅनलवर अनुसरण करत असल्याचे सांगितले आहे. या दहशतवादी हल्ल्यात २२ जण ठार झाले होते.

Leave a Comment