मोदी सरकारचा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा


नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे गंभीर आरोप असलेल्या आयकर विभागाच्या १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त स्तरावरच्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

स्वयंभू धर्मगुरू चंद्रास्वामी महाराज यांना मदत केल्याचा आरोप एका निलंबित अधिकाऱ्यावर आहे. त्यांच्यावर एका व्यावसायिकावर जबरदस्तीने वसुली आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. नोएडामधील एका अतिरिक्त आयुक्तावर २ महिला अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. आयआरएस स्तरावरच्या अधिकाऱ्याने आपल्या कुटुंबीयांच्या नावे ३ कोटी १७ लाखांची अवैध संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. ही संपत्ती भ्रष्टाचार आणि कायद्यांचे उल्लंघन करून जमा केल्याचा आरोप आहे. या अधिकाऱ्याला सेवानिवृत्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जबरदस्तीने वसुली आणि चुकीच्या पद्धतीने फायलींवर सही केल्याचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यालाही सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका बनावट कंपनीच्या व्यावसायिकाला मदत करण्यासाठी ५० लाखाची लाच मागतल्याचा गंभीर आरोप आयकर अधिकाऱ्यावर होता. यासोबतच त्याने भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. या अधिकाऱ्यालाही सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Leave a Comment