जॅकलिन साकारणार स्मिता पाटील यांची व्यक्तिरेखा


मागील काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत बायोपिक चित्रपटांच्या ट्रेंडसोबतच रिमेकचा ट्रेंडही चांगलाच स्थिरावला आहे. आता याच ट्रेंडअंतर्गत प्रेक्षकांच्या भेटीला आणखी एक चित्रपट येण्याची चिन्ह आहेत.

आता १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश भट्ट यांच्या ‘अर्थ’ या चित्रपटाचा रिमेक बनवला जाणार आहे. निर्माते, दिग्दर्शकांनी ज्यामधील स्मिता पाटील यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नावाला पसंती दिल्याचे वृत्त आहे. शरद चंद्र यांनी चित्रपटाच्या रिमेकची घोषणा २०१७ मध्ये केली होती.

जॅकलिनचे नाव स्मिता पाटील यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी पुढे येत असले तरीही याविषयीची कोणतीच अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पण, हा चित्रपट जर तिने स्वीकारला तर, प्रेक्षकांच्या तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षा आणि स्मिता पाटील यांच्या भूमिकेची एकंदर लोकप्रियता पाहता तिच्यासाठी हे मोठे आव्हान असणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या भूमिकेविषयी जॅकलिनला विचारण्यात आले आहे. त्याचबरोबर तिला संकल्पना आणि भूमिका दोन्ही आवडली असून, तीसुद्धा या चित्रपटाच्या रिमेकसाठी उत्सुक असल्याचे कळत आहे. अभिनेत्री शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा आणि स्मिता पाटील हे कलाकार १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अर्थ’ या चित्रपटातून झळकले होते. अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशी विषयावर प्रकाशझोत टाकत हा चित्रपट साकारण्यात आला होता. त्यामुळे आता त्याच्या रिमेकमध्ये नेमके कोणते कथानक साकारले जाणार याविषयीसुद्धा चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Comment