यंदाच्या वर्ल्डकप मध्ये बेल्सनी वाढविली खेळाडूंची चिंता


इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा आता अधिक रंगतदार होऊ लागल्या असतानाच यंदाच्या वर्षात वापरण्यात येत असलेल्या बेल्स खेळाडू आणि टीमचे कप्तान यांच्यासाठी चिंतेचा विषय बनल्या आहेत. याचे कारण म्हणजे आत्तापर्यंत पार पडलेल्या १४ सामन्यांपैकी ५ सामन्यात गोलंदाजाच्या चेंडूचा स्टंपना स्पर्श होऊनही बेल्स खाली पडलेल्या नाहीत आणि त्यामुळे फलंदाजाला आउट देता आलेले नाही. सर्वसाधारणपणे बॉलचा धक्का स्टंपना बसला कि बेल पडतात आणि फलंदाजाला औट दिले जाते.


क्रिकेट सामन्यात हवामान, पीच, वाहणारे वारे यावर सामन्याचा कल कुठे झुकणार याचा अंदाज बरेच वेळा करता येतो पण बेल्स न पडणे या नव्या डोकेदुखीची भर प्रथमच पडली आहे. अर्थात सामन्यात सामान्य बेल्स आणि जोरदार वारे वाहत असतील तर त्यासाठी वेगळ्या बेल्स वापरल्या जातात. या स्पर्धेत विशेष प्रकारच्या बेल्स वापरल्या जात आहेत. त्यांच्या आत फ्लॅशिंग लाईट्स आहेत त्यामुळे बेल्स अधिक वजनाच्या झाल्या आहेत आणि त्यामुळेच स्टंप हालली तरी बेल्स पडत नाहीत असे सांगितले जात आहे. अन्य काहींच्या म्हणण्याप्रमाणे स्टंपवर बेल ठेवण्यासाठी जो छोटासा खड्डा असतो तो यावेळी अधिक खोल असल्याने बेल्स पडण्यात अडचण येते आहे.


आयसीसीने मात्र या बेल्स सामान्य आणि जोरदार वारे वाहत असताना वापरल्या जाणाऱ्या बेल्स याच्या मधल्या वजनाच्या असल्याचे सांगून बेल्समध्ये काहीही दोष नाही असे स्पष्ट केले आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या ओव्हर मध्ये भारतीय गोलंदाज बुमराह यांचा बॉल डेव्हिड वार्नर यांच्या बॅटला लागून स्टंपवर गेला. बूमराहने विकेट मिळाल्याचा आनंदात उडीही मारली पण बेल्स न पडल्याने डेव्हिड नॉटऔट राहिला हे सर्वांनी पहिले.

असाच प्रकार इंग्लंड विरुद्ध द. आफ्रिका यांच्यातील सामन्यावेळी घडला. ११ व्या ओवर मध्ये याच प्रकारे स्टंपला धक्का लागूनही बेल्स जागेवरच होत्या तसेच न्यूझीलंड श्रीलंका सामन्यात श्रीलंकेच्या ६ व्या ओव्हर मध्ये टेंट बोल्टने करुणारत्नेचा बॉल फटकावला पण तो बॅटच्या आतल्या बाजूस लागून स्टंपवर गेला तरी बेल्स हलल्या नाहीत. ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज सामन्यात मिचेल स्टार्कने टाकलेल्या बॉलवर विकेट किपरने क्रिस गेलचा झेल घेतला. क्रिसला औट दिले गेले मात्र क्रिसने त्यावर आक्षेप घेतला तेव्हा रिप्ले मध्ये बॉल स्टंपला लागून गेल्याचे दिसले तेव्हा त्याला नॉटऔट दिले गेले. मात्र तेव्हाही बेल्स पडल्या नव्हत्या.

Leave a Comment