जुळे भाऊ एकाच वेळी बनले लष्करी अधिकारी


शनिवारी पार पडलेल्या देहरादून इंडिअन मिलिटरी अकादमीमधून ४५९ सैन्य अधिकारी देशाच्या सेवेत रुजू झाले असले तरी या बॅचने एक इतिहास घडविला आहे. यंदा प्रथमच जुळे भाऊ एकाच वर्षी या अकादमीतून लष्करी अधिकरी बनले आहेत. यापूर्वी जुळे भाऊ लष्करात दाखल होण्याच्या घटना घडल्या आहेत पण एकच वर्षी एकाच बॅच मधून दोघे जुळे अधिकारी बनण्याची घटना देहरादून मिलिटरी अकादमीत प्रथमच घडली आहे. त्यामुळे या दोघा बंधूंची चर्चा सोशल मिडीयावर होत आहे. हे दोघे आयडेंटीकल म्हणजे हुबेहूब दिसणारे आहेत.

२२ वर्षीय अभिनव आणि परीणव यांचा जन्म दोन मिनिटांच्या अंतराने झाला होता. अभिनव दोन मिनिटांनी मोठा आहे. त्यांचे दोघांचे शालेय शिक्षण अमृतसर मध्ये एकत्र झाले मात्र त्यानंतर इंजिनीअरिंगचे शिक्षण वेगळ्या कॉलेज मधून झाले. अभिनवने संगणक तर परीणवने मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी मिळविली आहे. दोघानाही लहानपणापासून लष्करी अधिकारी बनायचे होते आणि दोघांचीही निवड देहरादून मिलिटरी अकादमी मध्ये एकाच वेळी झाली आणि दोघांनी एकाच वेळी हे प्रशिक्षण पूर्ण केले. आता पुन्हा त्यांना वेगळे होण्याची वेळ आली असून अभिनव एअर डिफेन्स कॉर्प्स मध्ये रुजू होईल तर परीणव एव्हीएशन युनिट मध्ये रुजू होईल.


पासिंग औट परेडनंतर या दोघांनीही येथे शिक्षण घेत असताना दोघातील साम्यामुळे कसा गोंधळ होत असे त्याचे किस्से शेअर केले. अभिनव म्हणाला आमचे ड्रिल इंस्ट्रक्टर बरेच वेळा माझ्यासाठी असलेल्या सूचना परीणवला देत. तर परीणव अनेकवेळा त्याच्या कंपनी मेस मध्ये जास्त गर्दी असेल तर अभिनवच्या मेस मध्ये जाऊन जेवत असे पण कुणालाही ते कळत नसे. दोघांची खरी ओळख त्यांनी पिटी युनिफॉर्म घातला असेल तेव्हा किंवा कॉलरवर संबंधित कंपनीचा बॅज लावला असेल तेव्हाच पटत असे. दोघे सांगतात आम्हाला जे मिळवायचे होते ते आम्ही दोघांनी एकत्र मिळविले आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

अभिनव आणि परीणवचे वडील अशोक पाठक सांगतात लहानपणापासून दोघांच्यात निकोप स्पर्धा होती आणि अभ्यास करतानाही ते अगदी चढाओढीने करत असत.

Leave a Comment