असे आहेत नवे गृहमंत्री अमित शहा


एखाद्याच्या सार्वजनिक प्रतिमेवरून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज करणे अवघड असते कारण हे पूर्ण वेगळे असे दोन पैलू आहेत. सार्वजिनक जीवनात माणूस जसा असेल तसाच तो व्यक्तिगत जीवनातही वागत असेल असे समजणे विज्ञानाला धरून होणार नाही कारण विज्ञान व्यक्तीचे बाह्य रूप व आंतरिक गुण वेगळे मानते. नुकत्याच स्थापन झालेल्या १७ व्या लोकसभेत गृहमंत्री पदाची महत्वाची जबाबदरी सोपविले गेलेले अमित शहा यांचे खरे व्यक्तिमत्व कसे आहे याची उत्सुकता असणाऱ्या वाचकांना आम्ही काही माहिती देत आहोत.

पोलादपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे आणि शहा कुटुंबाचे सुरवातीपासून चांगले संबंध आहेत.१९७७ मध्ये पटेल यांच्या कन्या मणीबेन यांनी निवडणूक लढविली तेव्हा अमितभाई १३ वर्षाचे होते आणि तेव्हाही मणीबेन यांच्या प्रचारात त्यांनी खूप काम केले होते असे सांगतात. संघाचे स्वयंसेवक, भाजपचे मोठे नेते ते भारताचे गृहमंत्री हा त्यांचा प्रवास त्यांची जडणघडण, संस्कार, जीवनमूल्ये यांना धरूनच झालेला आहे. त्यांच्या जीवनावर आईचा मोठा प्रभाव आहे. अमित शहा यांच्या मातुश्री पूर्ण गांधीवादी होत्या आणि त्यांनीच अमितभाई ना उच्च जीवनमूल्ये शिकविली. रामायण, महाभारत, इतिहास, अध्यात्म यांचे संस्कार घरातच त्याच्यावर घडले.


धीर गंभीर, कठोर प्रशासक अशी ओळख असलेले अमितभाई गांधीजींची भजने सतत गुणगुणत असतात. त्यांच्या आजोबांनी त्यांना घरातच आचार्य नेमून शिक्षणाची दीक्षा दिली होती. त्यावेळी पारंपारिक गुरुकुल वेशभूषेत अमित शहा शिकत असत. त्यांच्यावर महर्षी अरविंद यांच्या विचाराचाही मोठा प्रभाव आहे. त्यांच्या घरात महर्षी आले होते आणि ते ज्या खुर्चीवर बसले होते ती आजही जपून ठेवली गेली आहे. अमित शहा यांचे घराणे श्रीमंत घराणे आहे मात्र लहानपणापासून त्यांच्यावर काटकसरीने जीवन जगण्याचे संस्कार केले गेले होते. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते म्हणून पक्षकार्य करत असताना ते सार्वजनिक बसमधून स्वतःचा डबा बरोबर घेऊन प्रवास करत असत.


त्यांना बुद्धिबळाची आवड प्रथमपासून असून हा खेळ ते उत्तम खेळतात. क्रिकेट त्यांना आवडते. सावरकर आणि चाणक्य यांचा राष्ट्रवाद आणि शिकवण त्यांनी आत्मसात केली आहे. त्यांच्या खोलीत सावरकर आणि चाणक्य यांचे फोटो आहेत. गांधी यांचे विचार त्यांना मननीय वाटतात आणि शंकराचार्य यांचे अध्यात्म त्यांना आवडते. भाजप कार्यालयातून त्यांनीच वाचनालय संस्कृती रुजविली आहे. कैफी आझमी त्यांचे आवडते कवी आहेत. ते नियमाने डायरी लिहितात. खाण्याचा त्यांना शौक असून भजी हा त्यांचा आवडता पदार्थ आहे.

अमित शहा यांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास दांडगा आहे. सुनेला बाळ जन्माला येण्याअगोदर त्यांनी लक्ष्मी घरात येणार असे सांगितले होते आणि त्याप्रमाणे त्यांना नात झाली. समाजातील वाईट रूढी बद्दल त्यांना चीड आहे. त्यांच्या मुलाचा आंतरजातीय विवाह असून शहा यांचा या विवाहाला पूर्ण पाठींबा होता. शहा संवादप्रिय आहेत. त्यांची राहणी अगदी साधी असून ते आवर्जून खादी वापरतात. वक्तशीर, काटकसरी आणि लक्ष्यप्राप्ती पर्यंत आराम नाही अशी त्यांची वागणूक आहे. त्यांचे घर अगदी साधे आहे आणि कुणी गिफ्ट दिल्या तर ते त्यांना अजिबात आवडत नाही.


शहा यांचा जन्म मुंबई मध्ये झाला असून पदवीचे शिक्षण त्यांनी अहमदाबाद येथून पूर्ण केले आहे. कॉलेज जीवनात ते आरएसएसचे स्वयंसेवक बनले आणि तेथेच त्यांची १९८२ साली नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी अमितभाई १८ वर्षाचे होते मात्र आजही शहा आणि मोदी यांची गाढ मैत्री आहे.

अमित शहा यांनी २०१२ मध्ये गुजराथ विधानसभा निवडणूक अर्ज भरला तेव्हा दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार त्यांचावर २ मर्डर, ३ कीडनॅपिंग आणि १ खंडणी मागणे असे गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली होती.

Leave a Comment