धोनीचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहित शर्माने मोडला


लंडन – काल विश्वचषक स्पर्धेत द ओव्हल मैदानावर भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवल्या गेलेल्या १४ व्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३५३ धावांचे आव्हान ठेवले होते. यात भारतासाठी शिखर धवनचे (११७), रोहित शर्मा (५७) आणि कर्णधार विराट कोहलीने (८२) धावा केल्या. यावेळी महेंद्रसिंग धोनीचा एक मोठा विक्रम रोहित शर्माने आपल्या नावे केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात रोहितने ३ चौकार आणि २ षटकारासह ७० चेंडूत ५७ धावा केल्या. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने धोनीला मागे सारत चौथे स्थान पटकावले आहे. धोनीच्या नावावर सध्या ३५४ तर रोहितच्या नावावर ३५५ षटकार जमा आहेत.

वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल ५२० षटकारांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. शाहिद आफ्रिदी ४७६ तर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम ३९८ षटकारांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

Leave a Comment