भाजप नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, वेगवेगळे बलात्काराचे प्रकार असतात


लखनऊ: उत्तर प्रदेशमधील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच तेथील सत्ताधारी या वास्तवाचा स्वीकार करण्याऐवजी इतर गोष्टींनाच दोष देण्यात धन्यता मानत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकताच प्रसारमाध्यमांशी उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री उपेंद्र तिवारी यांनी संवाद साधला. त्यांना यावेळी उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांच्या वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. उपेंद्र तिवारी यांनी त्यावर बलात्काराच्या घटनांच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी यावेळी बलात्काराचे वेगवेगळे प्रकार असतात, हे लक्षात घेतले पाहिजे, अशी पुस्तीही जोडली.

जर एखाद्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला तर तो गुन्हा ठरतो. पण, जेव्हा एखाद्या ३०-३५ वर्षांच्या महिलेवर बलात्कार झाल्याचे आपण ऐकतो तेव्हा मनात काही शंका उपस्थित होतात. सात-आठ वर्ष या महिलांचे प्रेमप्रकरण असते. मग आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार एके दिवशी त्या दाखल करतात. त्यांनी तेव्हाच या गोष्टींचा विचार करायला पाहिजे होता, असे उपेंद्र तिवारी यांनी म्हटले. सोशल मीडियावर उपेंद्र तिवारी यांच्या या वक्तव्याची क्लीप व्हायरल झाली असून त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.

दरम्यान, सरकार याकडे गंभीरपणे पाहत असल्याचेही उपेंद्र तिवारी यांनी सांगितले. बलात्काराची घटना शहरात कोठेही घडल्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याची माहिती घेतात आणि आरोपींविरोधात कठोरातील कठोर कारवाई करणे, ही सरकारची जबाबदारी असल्याचेही, त्यांनी म्हटले.

Leave a Comment