सासूची सूनेविरोधात कांद्याची फोडणी देते म्हणून पोलीस तक्रार


आपल्या देशात म्हणा किंवा परदेशात म्हणा सासू-सुनेचे भांडण हे काही आपल्याला नवीन नाही. त्यातच काही सासू आपल्या सुनेला मुलीच्या स्थानी मानून त्यांच्या सोबत मुली सारखा व्यवहार करतात. तर काही सासू आपल्या सूनेचा जाच करताना मागे पुढे पाहत नाही. पण आज आम्ही तुम्हाला याबाबत एक वेगळी बातमी देणार आहोत.

ही घटना उत्तर प्रदेशातील विलासपूर परिसरात घडली असून भाजीला सून कांद्याची फोडणी देते म्हणून तक्रार करण्यासाठी एका सासूने चक्क पोलीस ठाण्‍यात धाव घेतली आणि पोलीस ठाण्यात गोंधळ घातला.

दनकौर परिसरातील विलासपूरमध्‍ये राहणार्‍या ८० वर्षांच्‍या वृद्ध महिलेला खाण्यात कांदा अजिबात आवडत नाही. कांदा मला अजिबात आवडत नाही हे सूनबाईला माहीत आहे. तरी देखील ती वारंवार भाजीला कांद्याची फोडणी देत असते आणि माझ्या मुलाचीही यामध्ये सूनेला साथ असल्याची अशी तक्रार करण्यासाठी पोलीस स्थानकात या सासूबाई पोहोचल्या होत्या. पोलीस देखील त्यांची तक्रार ऐकून चक्रावले आणि पोलिसांनी त्यांना हे तुमचं घरगुती प्रकरण आहे असल्याचे सांगितले. पण कोणाचे काहीही ऐकण्याच्या तयारीत सासूबाई नव्हत्या. यासंदर्भातील वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले असून त्यानी दिलेल्या वृत्तानुसार, सासूबाईंची समजूत काढण्‍यासाठी अखेरीस पोलिसांनी त्यांच्या मुलाला बोलावल्यानंतर येथून पुढे भाजीला कांद्याची फोडणी देणार नसल्याचे मुलाने सांगितल्यावर सासूबाई शांत झाल्या आणि घरी परतल्या.

Leave a Comment