उणे 60 डिग्रीतही सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना करावा लागतो या परिस्थितींचा सामना


आपले जवान दिवसरात्र डोळ्यात तेल ओतून देशाच्या सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडत असतात. पण त्यांना अशी ही कठिण जबाबदारी पार पाडताना निसर्गाच्याही कठिण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यांना कधी ऊन, कधी पाऊस आणि कधी कडाक्याच्या थंडीचा ही सामना करावा लागतो. अशातच भारताच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना सियाचीनमध्ये तब्बल उणे 60 डिग्री तापमानातही आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठीही कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, याची माहिती देणारा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्यांना गोठवणाऱ्या थंडीत खाण्यासाठी देण्यात आलेला ज्यूस, अंडी आणि अन्य सामान गोठून गेल्याचे दिसत आहे. त्यातच अंडी हातोड्यानेही फोडण्यास किती कष्ट घ्यावे लागत आहे हेही त्यातून दिसत आहे. सोशल मीडियावर नुकताच जवानांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तीन जवान या व्हिडीओमध्ये दिसत असून त्यातील एक जवान त्यांना देण्यात आलेला ज्यूसचा डब्बा उघडून तो गोठल्याचे दाखवत आहे. तर तो गोठलेला ज्यूस हातोडा मारूनही तोडण्याचे प्रयत्न जवान करत आहे.

एक जवान कशाप्रकारचे गोठलेली अंडी खाण्यास मिळत आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करत या व्हिडीओमध्ये आहे. यानंतर ते जवान गोठलेले बटाटे, कांदे, टोमॅटो आणि आले हेदेखील तोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या व्हिडीओद्वारे एका जवानाने उणे 70 पर्यंत सियाचीनमधील तापमान अनेकदा जात असल्याची माहितीही दिली आहे. जवानांना देशाच्या सर्वाधिक उंचीवर असलेल्या सीमेचे रक्षण करताना कोणत्या कठिण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, याची झलक यातून पहायला मिळतेय.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. किती कठिण परिस्थितीचा सामना आपले सैनिक करत आहेत. तथाकथित लिबरल आणि सेक्युलर लोकांना हा व्हिडीओ पाठवला पाहिजे, जे सैन्याचे मनोधैर्य खचवण्याची कोणतीही संधी सोडत नाही. तर आणखी एका युझरने सैनिकांचे जीवन किती कठिण आहे याची प्रचिती यातून येत असल्याचे सांगत त्यांच्या शौर्याला वंदन केले आहे.

Leave a Comment