विजयाचे कौतूक संपले असेल तर तेवढे ‘बेटी बचाव’चे बघा


मुंबई – शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकातून मित्रपक्ष भाजपवर अलिगड प्रकरणावरून सेनेने टीका केली आहे. सामनामधून या दरम्यान काही सिने कलाकारांवर देखील निशाणा साधण्यात आला आहे. शिवसेनेने भाजपचे कान टोचताना विजयाचे कौतूक संपले असेल तर तेवढे अलिगडमध्ये घडलेल्या भयंकर घटनेकडे देखील थोडेसे लक्ष द्या, असे म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये काही दिवसांपूर्वी उसने दिलेले १० हजार रुपये परत मागितले म्हणून अडीच वर्षाच्या बालिकेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. संपूर्ण देशात या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेने या घटनेच्या पार्श्वभूमीवर भापजवर चांगलीच आगपाखड केली आहे.

‘निर्भया कांड’ काँगेस राजवटीत घडले तेव्हा संसद ज्यांनी चालू दिली नाही व महिला अत्याचाराविरोधात सरकारला कठोर कायदे करायला भाग पाडले. ते सर्व लोक आज सत्तास्थानी आहेत. तरीही राजरोसपणे अशा गोष्टी घडत असतील तर ‘बेटी बचाव’चा नारा अपयशी ठरत आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपमधील अनेक नेते चर्चेत असतात. भाजपने अशा वाचाळविरांना आवरण्याचा सल्ला सेनेने दिला आहे. मागे बलात्काराच्या एका आरोपीस भाजप खासदार साक्षी महाराज खास जेलमध्ये जाऊन भेटले. त्यावर उत्तर प्रदेशात आता हंगामा सुरू आहे, असे भेटणे योग्य आहे का? अशा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला आहे.

देशात वणवा पेटला असताना काहींनी परंपरेप्रमाणे निषेधाच्या मेणबत्त्या पेटवल्याची टीकाही सेनेनी केली. या घटनेवर अक्षय कुमार, अनुपम खेर, अभिषेक बच्चन, सानिया मिर्झा अशा ‘उत्सव’ मंडळींनी चीड, संताप व्यक्त करून दुःख व्यक्त केले आहे. हे सेलिब्रिटी फक्त मी भयभीत आहे, अस्वस्थ आणि निराश आहे, अशी वरवरची वक्तव्ये करत असल्याचे यात म्हटले आहे.

Leave a Comment