झाड उन्मळून पडल्याने उघड झाले अंमली पदार्थांच्या छुप्या लॅबचे रहस्य


नेदरलँड्समध्ये अलीकडेच आलेल्या वादळामुळे उन्मळून पडलेल्या झाडाचा पसारा सावरत असताना सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने अकस्मात एका अंमली पदार्थांच्या लॅबचा धक्कादायक शोध लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. ही घटना गुरुवारी घडली असून, apf.com या वेबसाईटने या घटनेच्या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. गुरुवारी आलेल्या जोरदार वादळाने नेदरलँड्स येथील ओड-वोसेन्मेअर या गावातील भला मोठा वृक्ष उन्मळून पडला. वादळ शमल्यानंतर सफाई कर्मचारी हा वृक्ष रस्त्यातून बाजूला करण्यासाठी आले असता, या परिसरामध्ये रसायनांच्या लॅबमधून येतो तसा विचित्र वास येत असल्याची जाणीव त्यांना झाली. या परिसरामध्ये या सफाई कर्मचाऱ्यांचे नेहमीच येणे जाणे असल्याने या परिसरामध्ये कोणतीही रासायनिक प्रयोगशाळा अस्तित्वात नसल्याची खात्री या कर्मचाऱ्यांना होती.

जिथे झाड कोसळले होते, तिथून जवळच असलेल्या एका शेतामध्ये बांधली असलेली एक भली मोठी शेड या कर्मचाऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही, तसेच या शेडमध्ये ये-जा करणाऱ्या व्यक्तींचे वर्तनही कर्मचाऱ्यांना संशयास्पद वाटू लागले होते. अखेरीस या सफाई कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेत पोलिसांना आणि स्पेशल एजंट्सना पाचारण करण्याचे ठरविले.

घडल्या प्रकाराची सूचना मिळताच पोलिसकर्मी आणि स्पेशल एजंट्स घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या शेतातील शेडची आणि आसपासच्या परिसराची बारकाईने पाहणी सुरु केली. त्यावेळी या शेडमध्ये अंमली पदार्थांचा भला मोठा साठा असल्याचे पाहून आणि त्याचबरोबर या पदार्थांच्या निर्मितीसाठी एक लॅब या ठिकाणी चालविली जात असल्याचे पाहून सर्वच जण चक्रावले. प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या अनुसार या शेडमध्ये सापडलेला अंमली पदार्थांचा साठा नेमका किती होता हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी आजवर संपूर्ण देशामध्ये सापडलेल्या अंमली पदार्थांच्या साठ्यांपैकी हा साठा सर्वात मोठा असल्याचे समजते. या लॅबमध्ये कोकेनसह इतर अनेक अंमली पदार्थांचे साठे सापडले असून, या लॅबची बारकाईने पाहणी करण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र या लॅबमध्ये कामाला असणाऱ्या लोकांनी पोलिसांच्या आगमनाची चाहूल लागताच आधीच पोबारा केल्याने अद्याप कोणालाही अटक केली गेली नसल्याचे समजते.

Leave a Comment