या बॅटमुळे क्रिकेट रूलबुक मध्ये करावा लागला बदल


एखादी बॅट क्रिकेट संबंधी नियम निश्चित केलेल्या रूल बुकमध्ये बदल घडविण्यास कारणीभूत ठरली असे सांगितले तर चटकन कुणी विश्वास ठेवणार नाही. मात्र असा प्रकार खरोखरी घडला होता. ४० वर्षापूर्वी म्हणजे १५ डिसेम्बर १९७९ मध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ येथे खेळल्या गेलेल्या अॅशेष सिरीज सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिली बॅटिंग करत होता तेव्हा त्याने आयन बोथमचा एक बॉल एक्स्ट्रा कव्हरला तडकावला आणि एक मोठा आवाज झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था ८ विकेटवर २१९ अशी होती. आवाज कसला झाला याचा तपास केला गेला तेव्हा लिली लाकडाऐवजी अल्युमिनीयम पासून बनविलेल्या बॅटचा वापर करत असल्याचे लक्षात आले. लिलीने ही बॅट १२ दिवस अगोदर झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात वापरली होती पण तेव्हा कुणी आक्षेप घेतला नव्हता.


इंग्लंड विरुद्ध सामन्यात मात्र इंग्लंडचा कप्तान माईक ब्रियर्ली याने या बॅटमुळे चेंडूचा आकार बदलू शकतो असा आक्षेप घेतला आणि अम्पायरनी लिलीला ही बॅट वापरता येणार नाही असे सांगितले. लिलीने त्यावर क्रिकेट रूल बुक मध्ये लाकडाचीच बॅट वापरली पाहिजे असा कुठेही नियम नसल्याचे निदर्शनास आणून दिले आणि रागाने बॅट फेकून दिली. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कप्तान ग्रेग चॅपलने त्याची समजूत घालून लाकडी बॅट वापर असे समजावले. मात्र तेव्हाचा क्रिकेट रूल बुक मध्ये लाकडी बॅटचाच वापर केला पाहिजे असा नियम बदल केला गेला.

बेसबॉल मध्ये लाकडी बॅटचा वापर सुरवातीपासून होत असे पण त्यानंतर अल्युमिनियम बॅट वापरली जाऊ लागली तेव्हा त्यावरून प्रेरणा घेऊन क्रिकेट क्लब खेळाडू आणि लिलीचा मित्र ग्रॅहम मोन्घन याने क्रिकेटसाठी अल्युमिनियमची बॅट बनविली. लिली त्याचा बिझिनेस पार्टनर होता. मात्र लिलीने या बॅटचा वापर केल्याने जो वाद निर्माण झाला त्यामुळे या बॅटना प्रचंड मागणी आली आणि त्यांची जोरदार विक्री सुरु झाली. काही दिवसातच रुल बुक मध्ये लाकडी बॅटच वापरली पाहिजे हा नवा नियम आला आणि अल्युमिनियम बॅटचा वापर बंद झाला. तरी क्रिकेटच्या इतिहासात या बॅटची नोंद झालीच.

Leave a Comment