औली मधील हायप्रोफाईल विवाह, २०० कोटींचा खर्च


उत्तराखंड राज्यातील हिम क्रीडा केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या औली या निसर्गरम्य ठिकाणी हायप्रोफाईल विवाहांचे आयोजन केले गेले असून मूळचे सहारनपुर गावाचे असलेले द. आफ्रिकेतील भारतीय वंशाचे प्रसिद्ध उद्योजक गुप्ता बंधू यांच्या दोन मुलांचे विवाह येथे होत आहेत. विशेष म्हणजे या स्थळाला पर्यटनासाठी प्रोत्साहन मिळावे आणि हे ठिकाण डेस्टिनेशन वेडिंग स्वरुपात प्रसिद्ध व्हावे यासाठी उत्तराखंड मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग यांनी गुप्ता बंधूना राजी केल्याचे समजते. गुप्ता बंधू त्यांच्या मुलांचे विवाह इटली मध्ये करणार होते आणि ही बाब त्यांनी त्रिवेंद्रसिंग यांची भेट घेतली तेव्हा सांगितली तेव्हा त्रिवेंद्रसिंग यांनी त्यांना औलीचा प्रस्ताव दिला आणि गुप्ता बंधूनी तो मान्य केला.


औली हे जोशीमठ पासून जवळ असलेले हिल स्टेशन हिवाळी बर्फ क्रीडेसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातून पर्यटक येथे येत असतात. आता गुप्ता कुटुंबियांच्या विवाह सोहळ्यामुळे ते एकदम चर्चेत आले असून या विवाहासाठी २०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शुक्रवारी विवाह विधीना प्रारंभ करण्यात आला असून मांडव घालण्याचा जागी भूमिपूजन केले गेले. या विवाहासाठी १५० पाहुणे निमंत्रित असून त्यांच्यासाठी २०० हेलिकॉप्टर बुक करण्यात आली आहेत. स्वित्झर्लंड मधून सजावटीसाठी ५ कोटी रुपयंची फुले मागविली गेली आहेत. या समारंभाची तयारी ई फोर्स इव्हेंट कंपनी कडे दिली गेली आहे. पाहुण्यात ५५ बॉलीवूड कलाकारांचा समावेश आहे. पाहुण्यांच्या निवासासाठी पंचतारांकित टेंट कॉलनी उभारली गेली आहे.


अजय गुप्ता यांचे चिरंजीव सुर्यकांत यांचा विवाहसोहळा १८ ते २० जून तर अतुल गुप्ता यांचे चिरंजीव शशांक यांचा विवाहसोहळा २० ते २२ जून या काळात होणार आहे. औली येथील रोप वे हा संपूर्ण काळ बुक केला गेला आहे. तसेच ज्या पाहुण्याना बद्रीनाथ दर्शन करायचे असेल त्यांना हेलिकॉप्टरने नेऊन दर्शन घडविले जाणार आहे. १६-१७ जून रोजी स्थानिक रहिवाश्यांना पहाडी पद्धतीचे भोजन दिले जाणार असून या विवाहामुळे स्थानिकांना फायदा मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. गुप्ता बंधूंचे द. आफ्रिकेच्या अध्यक्षांबरोबर जवळिकेचे संबंध होते आणि त्यामुळे गुप्ता बंधू वादात सापडले होते. सध्या ते दुबई येथे राहत आहेत.

Leave a Comment