आता मोदींना 10,000 पोस्टकार्ड पाठवणार मनसे


मुंबई : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीबाबत सक्रिय झाली आहे. मराठी भाषेला अभिजातेचा दर्जा केंद्र सरकारने देण्यासाठी दबाव वाढावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना 10 हजार पोस्टकार्ड पाठण्याची घोषणा मनसेने केली. याबाबतची माहिती मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली.

अभिजात भाषेचा तमिळ, संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम, उडीया या 6 भाषांना दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेबाबतही सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या विषयावर सखोल अभ्यास करत अनेक पुरावे आणि संदर्भांचा आधार केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषा तज्ज्ञांच्या समितीने घेतला आहे. त्यानंतर केंद्र सरकारला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची एकमताने शिफारस केली. मात्र, साडेचार वर्षे उलटूनही अद्याप यावर निर्णय झालेला नाही.

केंद्र सरकार भाषा तज्ज्ञांच्या शिफारसीनंतरही मराठीला अभिजाततेचा दर्जा देण्याची घोषणा करायला टाळाटाळ करत आहे, असा आरोप मनसेने केला आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना 10 हजार पोस्टकार्ड पाठवून तात्काळ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक कागदपत्रे, पुरावे केंद्राच्या तज्ज्ञ पठारे समितीने आपल्या अहवालात सादर केली आहेत. तरीही राज्य सरकार केंद्रावर दबाव टाकत नाही. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव अजून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे, असाही आरोप काळे यांनी केला.

Leave a Comment