पशुपतीनाथ मंदिराची संपत्ती प्रथमच जाहीर


नेपाळ येथील जगप्रसिद्ध आणि बारा ज्योतिर्लिंगातील अर्धे पशुपतीनाथ मंदिराने प्रथमच मंदिराकडे असलेल्या संपत्तीची माहिती जाहीर केली आहे. मंदिराच्या प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार या मंदिराकडे ९.२७ किलो सोने, ३१६ किलो चांदी, १ अब्ज २९ कोटी नेपाळी रुपयांची बँक डीपॉझीट आणि अनेक एकर जमीन आहे. अनेक वर्षे या मंदिराचे उत्पन्न किती आणि त्यांची संपत्ती किती याबाबत लोकांत उत्सुकता होती. नेपाळमधील श्रीमंत हिंदू मंदिरात या मंदिराचा समावेश केला जोतो. रोज हजारो नेपाळी हिंदू भाविक येथे दर्शनासाठी येत असतात आणि देवाच्या चरणाशी सोने. चांदी, पैसे वाहत असतात.


हे मंदिर प्राचीन आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे. हे मंदिर नक्की कधी बांधले गेले त्याची ठोस माहिती नाही. मात्र पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार ते ख्रिस्तपूर्व ४०० वर्षे जुने असावे. पशुपती एरिया डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे या मंदिराच्या कमाईची माहिती गोळा करण्यासाठी एक समिती नेमली गेली आणि या समितीने १९६२ ते २०१८ पर्यंतच्या संपत्तीचा हिशोब दिला आहे. त्यापूर्वीची कागदपत्रे जतन केली गेली नसल्याने ती माहिती देता आलेली नाही असे ट्रस्टचे अध्यक्ष मिलनकुमार थापा यांनी सांगितले.


बागमती नदी काठी असलेले हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी अर्धे असून हे आणि केदारनाथ मिळून पूर्ण ज्योतिर्लिंग मानले जाते. या मंदिराची कथा पांडवकाळाशी जोडलेली आहे. पशुपतीनाथाची दोन मंदिरे असून एक नेपाळ तर दुसरे भारतात मंद्सोर येथे आहे. या दोन्ही मंदिरातील शिवलिंग समान आहेत. पशु म्हणजे प्राणी आणि पती म्हणजे नाथ असा या शब्दाचा अर्थ असून शिवलिंग पाच मुखी आहे. नेपाळ मधील प्राचीन शासकांची ही अधिष्ठात्री देवता मानली जाते. नेपाळ मध्ये २०१५ साली झालेल्या भूकंपात मंदिराच्या आसपासच्या अनेक इमारती कोसळल्या पण या मंदिराचे नुकसान झाले नाही असे सांगतात.

Leave a Comment