या शहराची ८४ वर्षीय महिला एकमेव रहिवासी


जगाच्या पाठीवर एखाद्या छोट्या मोठ्या शहरात एकच व्यक्ती राहते असे सांगितले तर आपण कदाचित विश्वास ठेवणार नाही. पण अमेरिकेतील एल्सा एलर ही ८४ वर्षीय महिला अमेरिकेच्या नेब्रास्का भागात असलेल्या मोनोवी या शहरात गेली अनेक वर्षे एकटीच राहते आहे. तिचा जन्म याच गावात झाला आणि वयाच्या १९ व्या वर्षी तिने तिच्या शाळकरी मित्राबरोबर विवाह केला. तो युएस हवाई दलात होता.

अगदी सुरवातीला या शहरात १५० लोक राहत असत मात्र हळू हळू गाव रिकामे होत गेले. एल्साची तीन मुलेही कामानिमित्ताने गाव सोडून गेली आणि तिचा पती रुडी याचे २००४ साली निधन झाले. मात्र तरीही या गावाला कुणी भुताचे गाव म्हणू नये या इच्छेने एल्सा या गावातच मुक्काम ठोकून आहे.


एल्सा स्वतः या शहराची देखभाल करते. शहराचे पाणी, वीज बिल भरते त्यासाठी ५०० डॉलर्स खर्च करते. सरकारकडून गावातील विविध ठिकाणांची देखभाल करण्यासाठी तिला पैसे मिळतात ते कुठे खर्च करायचे याचा निर्णय तीच घेते. एल्सा हीच या शहराची महापौर, क्लर्क आणि ऑफिसर आणि एकमेव नागरिक आहे.

१९३० च्या दशकात येथे १५० लोक होते त्यांच्यासाठी ३ किराणा दुकाने, रेस्टॉरंटस, पोस्ट ऑफिस, जेल, रेल्वे सुविधा सर्व होते पण लोक गाव सोडून गेले आणि हे सर्व बंद झाले. एल्सा येथे एक धर्मशाळा चालविते. हे गाव पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना ती पाणी, चहा, स्नॅक्स देते. एल्साला सात नातवंडे आहेत मात्र एल्सा अखेरपर्यंत याच गावात राहणार आहे.

Leave a Comment