असे आहेत समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव


देशातील सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री ठरलेले आणि आता समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकात त्यांच्या पक्षाचा पारंपारिक विरोधी बहुजन समाज पक्षाची युती करून एक नवा प्रयोग करून पहिला आणि तो सपशेल फसला असे दिसून आले. मात्र याचे विशेष दु;ख अखिलेश यादव यांना झाल्याचे दिसले नाही ते त्यांच्या स्वभावामुळे. विज्ञानाचे विद्यार्थी असलेले अखिलेश नेहमीच नवीन प्रयोग करण्यास उत्सुक असतात आणि नवीन काहीतरी ट्राय करण्याची त्यांना सवय आहे.


समाजवादी पक्षाचा हा तरुण अध्यक्ष नेमका आहे तरी कसा याची फारशी माहिती जनतेला नाही. राजस्थान येथील सैनिक शाळेतून शालेय शिक्षण घेतलेल्या अखिलेश यांनी मैसूर विद्यापिठातून इंजिनिअरींग केले आहे आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी येथून सिव्हील एन्व्हायर्नमेंट मध्ये मास्टर्स केले आहे. अभ्यासात हुशार असलेल्या अखिलेश यांची खेळातील प्रगतीही चांगली असून बालपणापासून त्यांना क्रिकेटचे वेड आहे. मोठ्या भावाबरोबर ते नियमाने क्रिकेट सामने खेळण्यासाठी जात असत.


अखिलेश यांचे नाक वाकडे दिसते तो त्याच्या खेळाचा प्रताप आहे. मैसूर येथे शिकत असताना फुटबॉल खेळत असताना त्यांच्या नाकावर बॉल लागला आणि नाकाचे हाड मोडले पण त्यावेळी त्यांची प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरनी नाकाची सर्जरी करायला नकार दिला होता. अखिलेश यांच्यात स्पोर्ट्स जिगर आहे आणि त्यामुळे हरणे त्यांना मान्य नाही. परिणामी जिंकण्यासाठी ते कधी कधी चीटिंग करतात.

आयुष्य मोकळेपणाने जगणे त्यांना आवडते. त्यामुळे प्रसिद्ध असूनही त्यांना कधी त्याचा दबाव येत नाही. जबाबदारी नको म्हणून पैशाचे पाकीट ते कधीही बरोबर ठेवत नाहीत असे त्यांच्या पत्नी डिम्पल सांगतात. कॉलेज जीवनात सुद्धा ते पैसे खिशातच ठेवत, पाकिटात नाही. जबाबदारी आली तेव्हा मुलायमसिंग यांच्यावर विसंबून ते खिशात पाकीट बाळगत नसत. इटावा येथे शिकत असताना ते काकासोबत एका खोलीत अगदी कमी सामानात राहत असत.


अखिलेश यांचे इंग्रजी आणि हिंदीवर प्रभुत्व आहे तसेच ते कानडी उत्तम बोलतात. मैसूर येथे शिकताना त्यांनी चहाची टपरी चालविणाऱ्या माणसाकडून कानडी शिकून कॉलेज मध्ये कानडीत भाषण केले होते. प्रवासाची त्यांना खूप आवड आहे. डिम्पल यांच्या बरोबर त्यांचा प्रेमविवाह झाला असून डिम्पल निवृत्त आर्मी कर्नलची मुलगी आहे. त्या उत्तम पेंटर आणि हॉर्स रायडर आहेत. डिम्पल राजपूत असल्याने यादव कुटुंबाचा या विवाहला विरोध होता मात्र अमरसिंग याच्या मध्यस्तीने हा विवाह पार पडला. अखिलेश डिम्पल या जोडप्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे.

Leave a Comment