भारत दौऱ्यावर येणार पाकिस्तानचा क्रिकेट संघ ?


नई दिल्ली – भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध कशा प्रकारचे आहेत हे आपण सर्वच जाणतो. पण आता त्यातच पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) परवानगी मागितली आहे. हे सामने महिला विश्वचषकात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने २९ मे रोजी बीसीसीआयने केंद्र सरकारला पत्र पाठवून या दौऱ्यासाठी परवानगी मागितली आहे.

बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने एरियल स्ट्राईक केल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांतील तणावात भर पडली आहे. भारत-पाक यांच्यात गेल्या सहा वर्षांपासून क्रिकेट मालिका रंगलेली नाही. पण, बीसीसीआयसमोर महिला विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. २९ मे रोजी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला बीसीसीआयचे महाव्यवस्थापक (क्रिकेट ऑपरेशन्स) साबा करीम यांनी पत्र पाठवले आहे. त्यांनी या पत्रात बीसीसीआयची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

वुमन्स चॅम्पियनशिपचे आयसीसीतर्फे आयोजन केले जाते. यात संघांना एकमेकांविरुद्ध देशात आणि देशाबाहेरील मैदानांवर खेळावे लागते. विश्वचषकातील पात्रतेच्या दृष्टीने या स्पर्धेतील गुण महत्त्वाचे असतात, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

पाकसोबत संभाव्य वेळापत्रकानुसार जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत तीन सामने खेळावे लागणार आहे. बीसीसीआयने आयसीसीला या दौऱ्यासाठी संमती देण्यापूर्वी केंद्र सरकारला पत्र पाठवून या दौऱ्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे. तर क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Leave a Comment