दानशूर अझीम प्रेमजी विप्रोतून निवृत्त


विप्रोचे चेअरमन अझीम प्रेमजी यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी विप्रोच्या जबाबदारीतून निवृत्त होत असल्याचे गुरुवारी सांगितले असून गेली ५३ वर्षे विप्रोची धुरा त्यांनी सांभाळली आहे. आता ही जबाबदारी त्यांचे चिरंजीव रिशद यांच्याकडे दिली जात असून अझीम ३० जुलै रोजी कार्यकारी संचालक पद सोडत आहेत. त्यानंतर ते नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व संस्थापक म्हणून कंपनी बोर्ड मध्ये राहतील. प्रेमजी यांचा लौकिक जगभरात दानशूर असा असून त्यांनी त्यांच्या आत्ताच्या संपत्तीच्या चौपट रक्कम दान म्हणून दिली आहे. त्यांची सध्याची संपत्ती फोर्ब्सच्या रिपोर्ट नुसार ५.२ अब्ज डॉलर्स असून त्यांनी आत्तापर्यंत २१ अब्ज डॉलर्स म्हणजे १.४७ लाख कोटींची संपत्ती दान केली आहे.


अझीम सांगतात त्यांना त्यांच्या आईच्या धर्मादाय कामातून दान करण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांचा हा दान संकल्प २००१ पासून सुरु झाला असून तो आजही सुरूच आहे. त्यांनी ८७५ कोटी रक्कम दान करून अझीम प्रेमजी फौंडेशनची स्थापना २००१ मध्ये केली आणि त्यानंतर लगेच २८० अब्ज दान केले. या वर्षी मार्च मध्ये त्यांनी ५३,७५० कोटी किमतीचे शेअर्स दान केले आहेत.


अझीम अतिशय साधे आणि इमानदार उद्योजक म्हणून ओळखले जातात. आयुष्यात कधी हार तर कधी जीत असतेच पण महत्वाचे काय तर तुम्ही हराल तेव्हा काय धडा त्यातून शिकता तो विसरायचा नाही असे त्यांचे म्हणणे आहे. अतिशय साधी राहणी असलेले इकोनॉमी क्लास मधून जितक्या सहजतेने प्रवास करतात तितक्याच सहजतेने रिक्षातून जातात. ऑफिस बंद करताना कर्मचारी सर्व दिवे काळजीपूर्वक बंद करतात कि नाही हेही पाहतात आणि वॉशरूम मध्ये टॉयलेट पेपरचा वापर विनाकारण केला जाऊ नये अशी सूचनाही देतात. कामासाठी बाहेरगावी गेले तर कंपनीच्या गेस्टरूम मध्ये मुक्काम करतात आणि विमानतळावर रिक्षातून जाण्यात कमीपणा मानत नाहीत. मुंबईत वडापाव आणि सिंगापूर मध्ये स्ट्रीटफूड चा आस्वाद ते अगदी सामान्य लोकांप्रमाणे घेतात.

विप्रोच्या उद्योगाची मेढ त्यांच्या वडिलांनी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्यातील अंमळनेर गावी घातली. सुरवातीला त्यांचा तेलाचा व्यापार होता आणि आज त्याचा विस्तार होऊन तो सोप ते सॉफ्टवेअर असा विस्तारला आहे. अमळनेर हे गाव आज कोट्याधीशांचे गाव आहे कारण १९७० च्या दशकात विप्रोने ३ टक्के शेअर या गावातील शेतकरी, किराणा दुकानदार, सेवानिवृत्त यांना दिले होते आणि आज या शेअर्सचे मूल्य ४७५० कोटी इतके आहे.

Leave a Comment